जनतेज न्युज

पोटच्या पोराला विक्री करण्याचा मातेचा प्रयत्न

प्रतिनिधी, जळगाव : जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी कोणताही उपाय नसल्याने एक महिला ही आपल्या अपत्याला विक्री करण्याच्या प्रयत्नात असतांना पोलिसांनी तिला ताब्यात घेतल्याची धक्कादायक घटना अमळनेर येथे उघडकीस आली आहे. अमळनेर शहरातील गांधीलपुरा भागात एक महिला आपल्या मुलांची विक्री करत असल्याची माहिती पोलीस निरिक्षक जयपाल हिरे यांना २८ जुलै रोजी सकाळी मिळाली होती. त्यांनी या माहितीची खातरजमा करण्यासाठी महिला पोलीस नजमा पिंजारी, दीपक माळी आणि रवींद्र पाटील यांना पाठविले. या पथकाला संबंधीत महिला आढळून आल्याने तिला पोलीस स्थानकात नेण्यात आले.
पोलिसांनी चौकशी केली असता, संबंधीत महिलेचे नाव मीराबाई देवा गायकवाड (वय ४० वर्षे ) असून तिच्यासोबत चार मुले आणि तीन मुली होत्या. कोरोनाच्या काळात आपल्या पतीचे निधन झाल्यामुळे आपल्यासह मुलांना खाण्यासाठी काहीही नसल्याने आपण मुलांना विकत असल्याची धक्कादायक माहिती तिने पोलिसांना दिली. मात्र असे करणे बेकायदेशीर असून भविष्यात ती तिच्या मुलांना विकण्याची शक्यता गृहीत धरून या सातही बालकांना तपासणी करून बाल सुधारगृहात दाखल करण्यात आले आहे.