प्रतिनिधी, जालना : जालना जिल्ह्यातील चनेगावमध्ये गावाला वीजपुरवठा करणारी विद्युत डीपी जळाली असून दुरुस्तीसाठी ही डीपी महावितरण कार्यालयाकडे पाठवण्यात आली आहे. महावितरण अधिकाऱ्यांकडून ग्रामस्थांना डीपी देण्यात टाळाटाळ केला जात असल्याच्या निषेधार्थ आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. शहरातील मस्तगड भागातील महावितरण कार्यालयासमोर हे आंदोलन करत महावितरण विरोधात घोषणाबाजी करुन डीपी देण्याची मागणी केली. सध्या 12 वीच्या परीक्षा सुरु आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना डीपी अभावी अंधारातच अभ्यास करावा लागतो. अंधारामुळे मच्छरांचा देखील उच्छाद वाढला आहे. त्यामुळे अन्न त्याग आंदोलन करून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं महावितरणचा निषेध नोंदवण्यात आला आहे.
