जनतेज न्युज

पत्रकार मंगेश वाघमारेंचा अपघात करणाऱ्या वाहन चालकाच्या गुजरातमधून आवळल्या मुसक्या

प्रतिनिधी, राईगाव : सुधागड तालुक्यातील जेष्ठ पत्रकार, जनता मंच साप्ताहिकाचे संपादक, सम्यक क्रांती विचारमंच चे संस्थापक अध्यक्ष तथा वंचित बहुजन आघाडीचे जेष्ठ नेते मंगेश वाघमारे यांचे मागील महिन्यात सात जून रोजी खालापूर तालुक्यातील तुकसई गावाजवळ अपघाती निधन झाले होते. मंगेश वाघमारे यांच्या मोटरसायकलला एका अज्ञात वाहनाने धडक देऊन तो वाहन चालक पसार झाला होता. या अपघाताची सखोल चौकशी रायगड जिल्हा पोलिस अधीक्षक अशोक दुधे, अप्पर पोलीस अधीक्षक  अतुल झेंडे पाटील, खालापूर विभागीय पोलीस अधिकारी संजय शुक्ला , पोलीस निरीक्षक अनिल  विभूते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील सावंत देसाई यांनी अहोरात्र मेहनत घेऊन अत्यंत कठीण असलेल्या तपासाला योग्य दिशा दिली. काहीही झाले तरी या गुन्ह्यातील आरोपी व वाहनाचा तपास करायचाच असा चंग पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील सावंत देसाई यांनी बांधला होता. त्यांनी आपल्या चाणाक्ष बुद्धीने सर्व कल्पकता वापरून  जिद्द व कठोर मेहनत घेत तपासात सातत्य ठेऊन या  गुन्ह्यातील आरोपीला गुजरात मधून अपघाती वाहनासह पकडून आणले. या तपासात त्यांनी  पाचशेच्या वर सीसीटीव्ही फुटेज तपासले, अथक परिश्रम करून धागेदोरे मिळविले, आणि अखेर मंगेश वाघमारे यांचा अपघात करून पसार झालेला वाहन चालक व वाहन शोधून काढले आहे. खालापूर पोलिसांनी केलेल्या या  दैदिप्यमान कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. सदर अपघाताची सखोल चौकशी व्हावी व आरोपीला अटक करावी यासाठी सुधागड व खालापूर पत्रकार संघ, वंचित बहुजन आघाडी रायगड, ऑल इंडिया पँथर सेना यांनी निवेदनाद्वारे सातत्याने मागणी लावून धरली होती.   या गुन्ह्याचे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील सावंत देसाई व पोलीस टीम  यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल  त्यांच्यावर सर्व स्थरातून अभिनंदनाचा वर्षाव होतो.