जनतेज न्युज

पोटात चाकू भोसकून गर्भवती श्वानाची हत्या

प्रतिनिधी, वर्धा : वर्धेत माणुसकिला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका माथेफिरूने गर्भवती श्वानाची पोटात चाकू भोसकून हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. पाळीव प्राण्यांवर काही माथेफिरू हल्ला करत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. वर्ध्यात ही धक्कादायक घटना घडल्याने सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. श्वानाची हत्येची धक्कादायक घटना नुकतीच घडली असून आरोपीवर तातडीने गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी वर्ध्यातील युवा परिवर्तन आवाज संघटनेने केली आहे. देवळी शहराच्या ठाकरे चौकात या माथेफिरूने श्वानाची हत्या केलीय. हा धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. अज्ञात माथेफिरुने श्वानाच्या पोटावर चाकूने वार केल्यानंतर श्वानाने जीव वाचविण्याच्या प्रयत्नात पळ काढला. मात्र, काही अंतर दूरवर जातात श्वान जमिनीवर कोसळले आणि जागीच श्वानाचा मृत्यू झाला.या घटनेने शहरात चांगलीच खळबळ उडाली.ज्या ठाकरे चौकात ही क्रूर घटना घडली. तेथून पोलीस ठाणे अवघ्या ५० मीटर अंतरावर आहे. हातात खुलेआम चाकू घेऊन एक माथेफिरु परिसरात धिंगाणा घालतो ही मोठी शोकांतिका आहे, अशी प्रतिक्रिया युवा परिवर्तन की आवाज संघटनेचे संस्थापक निहाल पांडे यांनी दिलीय.