प्रतिनिधी, ठाणे : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या महामहीम महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते, खासदार सुधांशू त्रिवेदी यांचा निषेध करून शिवसेना ठाणे जिल्हा शाखेच्या शिवसेना, महिला आघाडी, युवसेना, युवतीसेना कार्यकर्त्यांनी आज सायंकाळी टेंभी नाका येथील गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या पुतळ्यासमोर भगतसिंग कोश्यारी यांच्या प्रतिमेस जोडा मारो आंदोलन केले. यासमयी भगतसिंग कोश्यारी यांच्याप्रती शिवसैनिकांच्या भावना अत्यंत तीव्र होता, “चाले जाव चाले जाव, कोश्यारी चाले जाव” अशा घोषणांनी शिवसैनिकांचा संताप अनावर झाला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जय जय कारच्या घोषणा देण्यात आल्या.
खासदार राजन विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले. यासमयी ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख मधुकर देशमुख, जिल्हाप्रमुख केदार दिघे, ओवळा माजिवडा विधानसभा क्षेत्र प्रमुख नरेश मणेरा, महिला जिल्हा संघटक रेखाताई खोपकर, सामिधाताई मोहिते, शहरप्रमुख प्रदीप शिंदे, उपजिल्हा प्रमुख सुनील पाटील, संजय घाडीगावकर, युवा अधिकारी किरण जाधव, युवती सेनेची अनिता हिलाल, ज्योती दुग्गल-कदम व सर्व विभागप्रमुख, शाखाप्रमुख, महिला आघाडी, शिवसेना, युवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
