प्रतिनिधी, सांगली : चोर पावलांनी येणाऱ्या चोर गणपतीची आज प्राण प्रतिष्ठापना सांगलीत करण्यात आली. श्री गणपती पंचायतन संस्थानच्या गणेश मंदिरात चोर गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते. भाद्रपद शुद्ध प्रतिपदेनिमित्त प्रतिष्ठापना होणाऱ्या या चोर गणपतीला 200 वर्षांची ही परंपरा आहे. श्री गणपती पंचायतन संस्थानच्या गणेशोत्सवाचा दरवर्षी शाही माहोल असतो. पंचायतन संस्थानच्या गणेशाची आगळी वेगळी परंपरा पण आहे. प्रसिद्ध अश्या गणपती मंदिरात प्रतिपदेला म्हणजे चतुर्थीच्या तीन दिवस आधी प्रतिष्ठापना होते.गणेश चतुर्थीला सर्वत्र थाटामाटात गणेशाचे आगमन होते. सांगलीत मात्र त्या अगोदर गणेशाचे आगमन होते. कोणालाही माहिती न पडता गणेशाची स्थापना होते. या प्रथेला चोर गणपती म्हणतात. भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते भाद्रपद शुद्ध पंचमी या काळात हा गणपती बसवला जातो. सांगली मध्ये ही गेल्या 200 वर्षा पासून परंपरा सुरु आहे, चोर गणपतीची मूर्ती कागदी लगदयापासून बनवली आहे. हा दीड दिवस गणपती असतो. या मूर्तीचे विसर्जन केले जात नाही. हया मूर्तीला सुखरूप ठिकाणी ठेवले जाते. त्याचे जतन केले जाते.या गणपती बरोबरच गणेश चतुर्थीला नियमित गणेशाची स्थापना होते. या ठिकाणी पाच दिवस गणेश आराधनेचा सोहळा असतो . राजे विजयसिंह पटवर्धन यांच्या श्री गणपती पंचायतन संस्थानच्या हया सोहळ्या साठी अनेक राज्यातील शेकडो भाविक येतात.
