प्रतिनिधी, धुळे : धुळे जिल्ह्यातील 128 ग्रामपंचायतींचा निकाल नुकताच हाती आला आहे. धुळे जिल्ह्यातील चारही तालुक्यातील आमदारांनी आपला गड राखत आपल्या तालुक्यांमध्ये आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. 128 धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात अमरीश पटेल, शिंदखेडा तालुक्यात जयकुमार रावल, धुळे तालुक्यात काँग्रेसचे कुणाल पाटील तर साक्री तालुक्यात मंजुळा गावित यांनी आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील 17 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत 17 पैकी 17 जागांवर भारतीय जनता पक्षाचे लोकनियुक्त सरपंच निवडून आले आहेत. शिरपूर तालुका हा आमदार अमरीश पटेल यांचा बालेकिल्ला राहिला आहे. भारतीय जनता पक्षाचा हा मोठा विजय झाला आहे त्यामुळे संपूर्ण तालुक्यात मतदारांनी भाजपला भरघोस मतदान केले आहे. त्यामुळे भाजप आमदार अमरीश पटेल यांनी शिरपूर तालुक्यातील मतदारांचे आभार मानले आहे.
