जनतेज न्युज

पुणे महापालिकेची दडपशाही, मुजोर पालिका अधिकाऱ्यांनी आंदोलन ठिकाणावरील निळे ध्वज काढुन टाकले, भ्रष्टाचार, गैरव्यवहार बाहेर आल्याने आंदोलकांवर खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी जाणिवपूर्वक आंदोलकांना भडकाविण्याचे कारस्थान

प्रतिनिधी, विजय लोणके : पुणे महापालिकेत झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचार व गैरव्यहारांची चौकशी मुंबई उच्च न्यायालयात मुख्य सरन्यायाधिशांमार्फत करण्याच्या मागणीसाठी पुणे महापालिकेच्या बाहेर संविधान परिषदेच्या वतीने दि. 1 नोव्हेंबर 2022 रोजीपासून बेमूदत धरणे आंदोलन सुरू आहे. तथापी आंदोलनाच्या ठिकाणी मुजोर अधिकाऱ्यांनी जाणिवपूर्वक भाषण बंद पाडणे, मायक्रोफोन लहान स्पीकर ओढून घेवून जाणे, आंदोलनाच्या ठिकाणी असलेले निळे ध्वज काढुन फेकणे, दारूड्या लोकांना आंदोलकांच्या अंगावर पाठविणे, भांडणे काढणे असे सर्व प्रकार सुरू असून, आंदोलन बंद पाडण्यासाठी आंदोलकांवर खोटे गुन्हे दाखल करण्याच्या हालचाली मोठ्या वेगाने सुरू असल्याचे दिसून आले आहे.

दरम्यान याबाबत पुणे शहर पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी पुणे तसेच महापालिका आयुक्त, व शिवाजीनगर पोलीस स्टेशन यांच्याकडे लेखी तक्रार अर्ज सादर केले आहेत. तथापी संबंधितांकडून अद्याप पर्यंत कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचे दिसून येत आहे.
संघटनेच्या वतीने पोलीस आयुक्त व जिल्हाधिकारी पुणे यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, पुणे महापालिकेच्या मुख्य प्रवेशव्दारावर संविधान परिषदेच्या वतीने, पुणे महापालिकेच्या विधी विभाग, कामगार कल्याण विभाग, सामान्य प्रशासन विभाग व बांधकाम विभागातील झालेल्या भ्रष्टाचार व गैरव्यवहारांची चौकशी मुंबई उच्च न्यायालयातील मुख्य सरन्यायाधिशांमार्फत करण्याच्या मागणीसाठी दि. 1 नोव्हेंबर 2022 ते आज दि. 09/12/2022 रोजीपर्यंत सुरू आहे. आज आंदोलनाचा 39 वा दिवस आहे. भारतत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आमचे समाजाला दिलेले व समाजाने मान्य केलेले अशोकचक्र निळे ध्वज आमचे आंदोलनाचे ठिकाणी लावले होते. तथापी आज सकाळी 11.30 ते 12.30 वाजेदरम्यान पुणे महापालिकेतील सुरक्षा कर्मचारी श्री. राकेश विटकर व त्यांचे इतर साथीदारांनी काढुन टाकले आहेत.

सदरहू आंदोलन ठिकाणावरील अशोक चक्र असलेले निळे ध्वज काढतांना पुणे महापालिकेने आमचे संघटनेचे अध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांना कोणत्याही प्रकारची नोटीस दिली नाही. किंवा काहीही कळविले नाही. निळे ध्वज आमचेसाठी आमची अस्मिता आहे हे संबंधितांना माहिती व जाणिव आहे. दरम्यान आंदोलन ठिकाणावरून जाणिवपूर्वक आमचे निळे ध्वज काढुन आमचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना उचकाविले जात आहे. तसेच आमचेवर खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत.

सदरहू पुणे महापालिकेवर सुरू असलेल्या आंदोलाचे ठिकाणी आमचे विचार व्यक्त करतांना, तेथे असलेले मायक्रोफोन लहान स्पीकर व आमची ऑटो रिक्षा कोणतीही नोटीस न देता श्री. राकेश विटकर यांनी बळजबरीने व बेकायदेशिररित्या पुणे महापालिकेत ओढुन नेली आहे. याबाबत देखील मा. शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. आंदोलनाचे पहिल्या दिवशी देखील आमचे आंदोलनाचा मांडवाचे साहित्य जप्त केले आहे. ते अद्याप पर्यंत दिले गेले नाही. सातत्याने आमचे आंदोलन दडपशाही करून मोडीत काढले जात आहे. आमचे विचार व्यक्त करतांना देखील त्यात अडथळे आणले जात आहेत. पुणे महापालिकेसमोरील देशी विदेशी दारूचे दुकानातील अनेक दारूडे आमचे आंदोलनाचे ठिकाणी येवून त्रास देत आहेत. जाणिवपूर्वक आम्हाला त्रास दिला जात आहे. आमचे भाषण स्वातंत्र्य, व्यक्तीस्वातंत्र्याविरूद्ध दडपशाही करून भारतीय संविधानातील तरतुदींचा भंग केला जात आहे.

तरी माझी संबंधित कर्मचारी श्री. राकेश विटकर व त्यांचे साथीदार तसेच त्यांना आदेश देणारे इसम नामे श्री. माधव जगताप, श्री. शिवाजी दौंडकर यांचे विरूद्ध फिर्याद आहे. या दोन लोकसेवकांचे खाते /विभागात मोठा भ्रष्टाचार व गैरव्यवहार झालेला आहे. तो आम्ही राज्य शासन, केंद्र शासन तसेच पुणे महापालिका यांचेकडे सादर केले आहेत. त्यामुळेच आमचे आंदोलन दडपण्याचे व संविधानातील तरतुदींचे उल्लंघन करून आमचे दबाव आणुन, आमचेवर खोटे गुन्हे दाखल करण्याच्या उद्देशाने हा सर्व प्रकार सुरू असल्याचे दिसून येत आहे. तरी आमचे व आमचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे जिविताचे काही बरेवाईट झाल्यास, त्याला वरील लोकसेवक जबाबदार असतील याची नोंद घेवून, आम्हाला कोणतीही पूर्वसुचना न देता, नोटीस न देता जाणिवपूर्व आमचे साहित्य उचलुन घेवून गेल्या प्रकरणी आमचे वरील इसमांविरूद्ध फिर्याद आहे. तरी संबंधित ज्या खात्यांसंबधात भ्रष्टाचार व गैरव्यवहारांचे आम्ही आरोप केले आहेत, त्याच खात्याचे खातेप्रमुख हे जाणिवपूर्वक आमचेवर दबाव व दशहत निर्माण करीत आहेत. श्री. राकेश विटकर हे कुणाच्या सांगण्यावरून हे कृत्य करीत आहेत. याबाबत संबंधितांकडे चौकशी करून आम्हाला न्याय मिळावा असे निवेदनात नमूद आहे.

दरम्यान या सर्व प्रकरणी पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी जातीने लक्ष घालण्याची विनंती करण्यात आली आहे.