जनतेज न्युज

वन कर्मचाऱ्यावर रेती माफियांचा हल्ला

प्रतिनिधी, बुलडाणा : संरक्षित जंगलातून अवैधरित्य रेतीचा उपसा करणाऱ्या ट्रॅक्टरला पकडून कारवाई करत असताना वन कर्मचाऱ्यावर रेती माफियांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे, यामध्ये तीन कर्मचारी जखमी झाले असून त्यापैकी एकाला गंभीर दुखापत झाली आहे, या सर्वांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ज्ञानगंगा अभयारण्यातील पिंपळगाव नाथ बीट मध्ये घडली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्य हे संरक्षित व प्रतिबंधित क्षेत्र आहे, या ठिकाणी वन्यजीव विभागाच्या पूर्व परवानगी शिवाय जाता येत नाही, असे असले तरीही अभयारण्यातून वाहणाऱ्या नदी व नाल्या मधून अवैधरित्या रेती तस्करी केली जाते.दरम्यान वनरक्षक सिद्धेश्वर पाटील आपल्या सहकाऱ्यांसह खामगाव रेंज मधील पिंपळगाव नाथ बीट मध्ये गस्त घालीत असताना, लोखंडा भागातील नदीतून काही लोक ट्रॅक्टर द्वारे रेतीचा उपसा करीत आहे, अशी गोपनीय माहिती मिळाली, त्यावरून ते तात्काळ घटनास्थळी पोहोचले असता काही लोक ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये रेती भरत असल्याचे त्यांना दिसून आले, त्यांनी ट्रॅक्टर ताब्यात घेत पुढील कारवाई करत असतानाच, कोथळी येथील युसुफ डॉन म्हणून ट्रॅक्टर मालक त्या ठिकाणी पोहोचला व त्याच्यासह इतर व्यक्तींनी लाठ्या-काठ्यांनी वन कर्मचाऱ्यावर हल्ला चढविला, यामध्ये वनरक्षक सिद्धेश्वर कारभारी पाटील, वनमजुर ज्ञानेश्वर पुंजाजी सोनूने व ज्ञानसिंग मोहन सिंग पडवाल हे तिघे यात जखमी झाले, त्यांना तात्काळ बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले असून याप्रकरणी वन गुन्हा दाखल करून बोराखेडी पोलीस ठाण्यात पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती खामगाव वनपरिक्षेत्र अधिकारी दीपेश लोखंडे यांनी दिली आहे.