जनतेज न्युज

वर्ध्याच्या आर्वी येथील नंदपूरच्या बाकळी नदीला पूर, विठ्ठलाच्या दर्शनाला जाणारे भाविक अडकले

प्रतिनिधी , वर्धा : वर्धा जिल्ह्यात शनिवारी पावसाने चांगलाच कहर केला. मुसळधार आलेल्या पावसामुळे नदी नाल्याना पूर आला आहे तर धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुद्धा सुरु करण्यात आला आहे. यामुळे आर्वी तालुक्यातील बाकळी नदीला पूर आला आहे. नदीला आलेल्या पुरामुळे आर्वी कौढण्यपूर राज्यमार्ग बंद झाला असून यावरील वाहतूक ठप्प झाली आहे. विदर्भाची पंढरी म्हणून अमरावती जिल्ह्याच्या कोंडाण्यापूर याला ओळखल्या जाते. आषाढी एकादशी निमित्त मोठ्या प्रमाणात भाविक येथे दर्शनासाठी येतात. बाकळी नदीला आलेल्या पुरामुळे वर्धा जिल्ह्यातून जाणारे भाविक येथे अडकले आहे. कोणत्याही प्रकारची दुर्घटना होऊ नये म्हणून या पुलावर पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावण्यात आला आहे. विठ्ठलची पूजा करण्याकरता जाणारे भाविक पुलावर पाणी असल्याने अडकून पडले आहेत. काही भाविक नदीच्या पलीकडूनच भजन कीर्तन करून विठ्ठलला साकडे घालत आहेत. सकाळपासून या पुलावरून पाणी असल्याने अनेक भाविक पाणी ओसरण्याची वाट पाहत आहे. शनिवारी आलेल्या पावसाने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.