जनतेज न्युज

वरुणराजाच्या साक्षीने मळेगाव येथे पार पडला वारकऱ्यांचा रिंगण सोहळा

प्रतिनिधी , सोलापूर : बार्शी तालुक्यातील मळेगाव येथे आषाढी एकादशीनिमित्त आज सकाळी  कर्मवीर ना.मा गडसिंग मित्र विद्यालय आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मळेगाव यांच्या वतिने पालखी सोहळ्याचे आणि भव्य रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.वरूणराजाच्या साक्षीने मळेगाव येथील मुख्य चौकात ग्रामस्थांच्या उपस्थित बाल वारकऱ्यांचा रिंगण सोहळा पार पडला.श्री विठ्ठल रुक्मिणी,संत ज्ञानेश्वर महाराज, संत  तुकाराम महाराज,संत गोरा कुंभार,संत गजानन महाराज,संत मुक्ताबाई, संत जनाबाई,संत कान्होपात्रा यांची वेशभूषा करून आलेल्या बाल वारकऱ्यांनी अनेकांचे लक्ष वेधुन घेतले. हातात टाळ,वीणा, चिपळ्या आणि मृदंगाचा नाद,फुगड्या,पाऊल,हातात घेतलेली भगवी पताका,डोक्यावर घेतलेली तुळस आणि हंडा,नागनाथ महाराज की जय,माऊली माऊली,विठ्ठल विठ्ठल विठ्ठला,हरी ओम विठ्ठलाच्या गाण्यावर विद्यार्थ्यांनी धरलेला ठेका,हरिनामाचा जयघोष आणि वरूण राजाची हजेरी यामूळे संपूर्ण वारकरी आणि ग्रामस्थ भक्तीरसात नाहून निघाले. पर्यावरण संवर्धनासाठी पालखी सोहळ्यात वृक्ष दिंडीचे देखील आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थी,गावातील महिला,पुरुषांनी आणि शिक्षकांनी फुगड्या खेळून एक वेगळाच उत्साह निर्माण केला.