प्रतिनिधी, अमरावती : मनपा निवडणूकीत यश मिळवायचे असेल तर विरोधी पक्षाने पूर्ण न केलेली आश्वासनांचा लेखा-जोखा जनतेसमोर मांडणे गरजेचे आहे. ज्यामुळे धार्मीक मुद्यांना स्पर्श न करता विकासाच्या मुद्यावरच मनपा निवडणूकीत यश मिळेल. असा विश्वास असल्याचे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने रवीवारी धर्मादाय सभागृहात आयोजित कार्यकर्त्यांशी संवाद बैठक कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी जयंत पाटील म्हणाले पक्ष वाढीसाठी प्रत्येक वार्डामध्ये क्रियाशील पक्षाचे सभासद तयार होणे गरजेचे आहे. त्यामुळे सभासद नोंदणीव अधिक भर आहे. ज्यांना नगरसेवक बनायचे आहे, त्यांनी वार्डात किमान ५० क्रियाशील सभासद तयार केले तर त्यांच्या तिकीटासंदर्भात विचार करण्यात येईल. जर कोणी वेळेवर प्रेवश घेतला तरी त्यालाही सुरवातीला ५० सभासद दाखवावे लागतील. येणाऱ्या काळात निवडणूक प्रचार यंत्रणा महत्वाची आहे. त्यामुळे पाचशे ते सहाशे महिला व पुरुष कार्यकर्ता हे निवडणूक काळात पूर्णवेळ संबधीत उमेदवार बरोबरच पक्षाचा प्रचार करतील. तसेच तेवढेच प्रशिक्षण देऊन कोणत्या मुद्यांचा प्रचार करावा या संदर्भात मार्गदर्शन करणारी एक वेगळी यंत्रणा तयार करावी लागेल. या पध्दतीने निवडणूकीच्या तारखेची वाट न पाहता तयारीला लागण्याचा सल्ला जयंत पाटीलांनी कार्यकर्त्यांना दिला.
