प्रतिनिधी, जळगाव : अमळनेर विधानसभा मतदारसंघातील व पारोळा तालुक्यातील शेळावे महसूल मंडळ अंतर्गत येणाऱ्या गावामध्ये ८५ मिली इतका ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने शेतकरी बंधवांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र महाबीज च्या पर्जन्यमापकात अचूक मोजणी होत नसल्याने अतिवृष्टीची नोंद होत नसल्याचा आरोप आमदार अनिल भाईदास पाटील यांनी केला आहे. आमदार अनिल पाटील यांनी तसेच तहसीलदार व कृषी अधिकारी यांना सोबत घेत रत्नापिंप्री, शेळावे बु., शेळावे खु., चिखलोड, दहिगाव, मोहाडी, दगडी सबगव्हाण, राजवड, खेडीढोक या गावांना भेटी देऊन आमदार अनिल पाटील यांनी ढगफुटी सदृश पावसामुळे झालेल्या नुकसान ग्रस्त भागाला भेट दिली. यावेळी कापूस व मका पिकाचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून आले. यावेळी त्यांनी ग्रामस्थ मंडळ व शेतकरी बांधव यांच्याशी चर्चा करून सर्व परिस्थितीचा आढावा घेतला व राज्य शासनाने तत्काळ पंचनामे करून, नुकसानग्रस्त भागासाठी व शेतकऱ्यांसाठी तत्काळ मदत जाहीर करावी व त्या परिसरातील ना दुरूस्त व खराब पर्जन्य मापक यंत्र तात्काळ बदलून चांगल्या प्रतीचे पर्जन्यमापक यंत्र बसवून मिळावे, जेणे करून पावसाचे अचूक पर्जन्यमान मिळून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान या भागातील ना दुरूस्त व खराब पर्जन्यमापक यंत्रामुळे त्या परिसरातील शेतकऱ्यांना मागील तीन वर्षा पासून पडणाऱ्या ओला दुष्काळ मुळे नुकसान भरपाई आज मिळाली नसल्याचेही यावेळी उघड झाले.
