प्रतिनिधी, मुंबई : अंमली पदार्थ विरोधी कक्ष, वरळी युनिट यांनी एकूण ७०१ किलो ७४० ग्रॅम वजनाचा व रुपये १४०३ कोटी ४८ लाख किमंतीचा “एम.डी. (मेफेड्रॉन) ” सदृश्य अंमली पदार्थ जप्त केला असुन मुंबई शहर व परिसरात मोठया प्रमाणात अंमली पदार्थाची पुरवठा करणारी आणि अंमली पदार्थाची निर्मिती, अवैधपणे करुन त्याचा व्यापार करणारी मोठी टोळी उघड करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
अंमली पदार्थ विरोधी विशेष मोहीमेंतर्गत अंमली पदार्थ विरोधी कक्ष, वरळी युनिट चे पथक, अंमली पदार्थ खरेदी-विक्री करणारे, पुरवठा, साठा करणारे इसमांचा गस्तीदरम्यान शोध घेत असतांना शिवाजीनगर, गोवंडी, मुंबई परीसरातुन संशयित आरोपी क्र. १ यास २५० ग्रॅम ‘एम.डी’ (मेफेड्रॉन) सदृश्य अंमली पदार्थासह ताब्यात घेण्यात आले. त्याचेकडे केलेल्या सखोल चौकशीत सदरचा ‘एम.डी’ (मेफेड्रॉन) सदृश अंमली पदार्थ त्यास आरोपी क्र. २ याने पुरविलेला असल्याचे स्पष्ट झाले. पुढील तपासात आरोपी क्र. २ याचेकडुन २ किलो ७६० ग्रॅम वजनाचा ‘एम.डी’ (मेफेड्रॉन) सदृश्य अंमली पदार्थ इतर साहीत्यासह जप्त करण्यात आला.
आरोपीकडे पोलीस पथकाने केलेल्या तपासात प्राथमीक माहिती मिळाली की, त्याने रसायन शास्त्रामध्ये ऑरगॅनिक केमिस्ट्रीचे शिक्षण घेतलेले असुन वेगवेगळे केमीकल एकत्रित करून त्यावर रासायनिक प्रक्रिया करून ‘एम.डी.’ (मेफेड्रॉन) हा अंमली पदार्थ बनविण्याचे ज्ञान त्याने आत्मसात केले आहे. तसेच तो मागणीप्रमाणे गिन्हाईकांना ‘एम.डी.’ (मेफेड्रॉन) हा अंमली पदार्थ विकत असतो अशी माहिती मिळाली. तसेच स्वतःची ओळख लपविण्यासाठी सदर आरोपी वेगवेगळ्या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मचा वापर करून अंमली पदार्थ व्यवसाय करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
