प्रतिनिधी , जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. पी. पी. पाटील यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, त्यांनी दिलेला राजीनामा राज्यपालांनीही स्विकारला असून, प्रभारी कुलगुरू म्हणून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ८ मार्चला डॉ. वायुनंदन हे पदभार स्वीकारणार आहेत.
फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात दिला होता राजीनामा-
कुलगुरू प्रा. पी. पी. पाटील यांनी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात प्रकृती अस्वास्थ्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे कुलगुरू पदाचा राजीनामा पाठविला होता. हा राजीनामा स्वीकारला असल्याचे राजभवनाचे पत्र विद्यापीठाला प्राप्त झाले असून ८ मार्च पासून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन यांच्याकडे प्रभारी कुलगुरूपदाचा पदभार देण्यात येत असल्याचेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे. प्रा. पी. पी. पाटील यांचा कार्यकाळ २५ ऑक्टोबर, २०२१ रोजी संपुष्टात येणार होता.
