जनतेज न्युज

उमरखेड तालुक्यातील घमापूर गावालाही किडनीचा विळखा : जिल्हा प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष

प्रतिनिधी , यवतमाळ : महागाव तालुक्यातील वडद येथे घरोघरी किडनी आजाराचे रुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर उमरखेड तालुक्यातील घमापूर येथील किडनी रुग्णांची व्यथा समोर आली आहे. येथे आतापर्यंत दहा जणांना किडनी आजाराने जीव गमवावा लागला. तर, अजूनही 25 पेक्षा जास्त नागरिक किडनी आजाराचा उपचार घेत आहे. किडनी आजार विळखा घालत असताना जिल्हा प्रशासनाचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील अनेक गावात फ्लोराईडयुक्त पाण्याचा पुरवठा केला जातो. पाण्याची नियमित तपासणी करणे आवश्यक असताना त्याकडेही दुर्लक्ष केले जाते. शासनाने लाखो रुपये किमतीचे जलशुद्घीकरण यंत्र बसवून दिले. परंतु, ते एकदा बसवून दिले की, बंद पडल्यास त्याची दुरुस्ती केली जात नाही. उमरखेड तालुक्यात घमापूर या गावात बंजारा समाजाची संख्या आहे. गेल्या तीन वर्षांत दहा ते बारा जणांना किडनी आजारामुळे जीव गमवावा लागला आहे. तर अजूनही जवळपास 25 रुग्ण आहे. नागपूर, नांदेड, पुसद येथे जाऊन उपचार घेत आहेत. जे रुग्ण आहेत, त्यात शेतकरी व मजुरांचा समावेश आहे. रुग्णांची परिस्थिती हालाखीची असल्याने महागडा उपचार घेणे अनेकांना परवडत नाही. तरी कसेबसे उपचार घेत जीवन जगत आहे. क्षारयुक्त पाण्यामुळे किडनीचा आजार बळावत असल्याचे डॉक्टरांनी रुग्णांना सांगितले आहे. गावालगत धरण आहे. पहाडातून अशुद्घ पाणी झिरपत असून, तेच पाणी घमापूर येथील नागरिकांना प्यावे लागत आहे. जलशुद्घीकरण यंत्र असले तरी नादुरुस्त असल्याने शोभेची वस्तू ठरत आहे.

या संदर्भात प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्याशी संपर्क साधला असता, घमापूर येथे रुग्णांची पाहणी करण्यासाठी पथक पाठवण्यात येईल, असे सांगून कॅमेऱ्यासमोर अधिक बोलण्याचे टाळले. आरोग्य विभागाचे पथक गावात खरंच येईल का, असा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे.