प्रतिनिधी , कल्याण डोंबिवली : कल्याण ठाकुर्ली रोडवरील कचोरे गावासमोर असणाऱ्या खाडी परिसरात दोघा चिमुकल्यांचा स्थानिकांनी जीव वाचवला होता. यामध्ये एका सहा महिन्यांच्या तान्ह्या बाळाचाही समावेश आहे. दरम्यान या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू असून या मुलांच्या आईचे नावही समोर आले असून या मुलांच्या इतर नातेवाईकांचाही शोध घेण्यात येत आहे. या मुलांना सध्या जननी आशिष संस्थेच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
काल दुपारी 2 ते अडीच वाजण्याच्या सुमारास कचोरे गावातील स्थानिकांना खाडीतील बेटावर दोन लहान मुलं दिसली आणि त्यांना एकच धक्का बसला. त्यातील एक जण साधारणपणे 2-3 वर्षांचा तर दुसरा तर अक्षरशः सहा महिन्यांचे तान्हे बाळ होते. गंभीर बाब म्हणजे खाडीला भरती सुरू झाली होती आणि हे दोन्ही चिमुकले असणारे ठिकाण आणि खाडीच्या पाणीमध्ये अवघ्या काही इंचाचाच फरक राहिला होता. कचोरे गावातील स्थानिक रहिवासी गणेश मुकादम, अमित मुकादम आणि तेजस मुकादम यांनी क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी धाव घेत या दोघांनाही सुखरूपपणे खाडीच्या बाहेर काढले. या मुलांना बाहेर काढण्यात थोडासा जरी विलंब झाला असता तर या चिमुकल्यांच्या जीवावर बेतले असते. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटना स्थळी धाव घेत या मुलांना ताब्यात घेत त्याच्या नातेवाईकांचा शोध सुरू केला
.या प्रकरणी दोन्ही मुलांच्या आईचा शोध घेण्यात येत असून ही मुलं 90 फूट रोड परिसरातच राहणारी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या महिलेचे नावही समोर आले असून या मुलांच्या इतर नातेवाईकांचाही शोध घेण्यात येत आहे. या मुलांना सध्या जननी आशिष संस्थेच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
