जनतेज न्युज

केंद्रीय व राज्य पुरातत्व विभागाकडून अंबाबाई मंदिराची पाहणी

प्रतिनिधी , कोल्हापूर : कोल्हापूर दि.१८- केंद्रीय व राज्य पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज करवीर निवासानी श्री.अंबाबाई (महालक्ष्मी) मंदिराची पाहणी केली. यावेळी मूर्तीची स्थिती उत्तम असल्याचं मत केंद्रीय पुरातत्व विभागाचे अधिकारी श्रीकांत मिश्रा यांनी व्यक्त केले. मात्र,उर्वरित अन्य मंदिर परिसरातील सर्व गोष्टींची पाहिणी करून त्यांच्या डागडुजीचा अंतिम निर्णय घेण्यात येईल, असंही यावेळी ते म्हणाले.
या पथकाने श्री. अंबाबाई मूर्तीची पाहणी केली. तसेच महासरस्वती, महाकाली या मूर्तीची देखील पाहणी केली. यावेळी अंबाबाईची मूर्ती २०१७ पेक्षाही अधिक सुस्थितीत आहे. केवळ पायाजवळ केमिकल कोटिंग करावे लागेल. मात्र, मूर्ती सुस्थितीत असल्याचे मिश्रा यांनी सांगितले.
दरम्यान, आज केंद्रीय पथकातील डेप्युटी सुप्रीटेंडीग श्रीकांत मिश्रा, सिनियर मॉडेलर सुधीर वाघ, राज्य पुरातत्व विभागाकडून विलास वाहणे यांनी पाहणी करून अंबाबाई मंदिरातील मुख्य गाभारा, मातृलिंग परिसर, तसेच मंदिराच्या छतावरील भागाच्या डागडुजीबाबत योग्य त्या सूचना दिल्या. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, सदस्य शिवाजी जाधव, सचिव विजय पोवार, व्यवस्थापक धनाजी जाधव, प्रभारी उपअभियंता सुयश पाटील, आर्किटेक्ट अमरजा निंबाळकर, मिलिंद घेवारे आदी उपस्थित होते.