प्रतिनिधी, ठाणे : घातक सप्लिमेण्ट्री घेऊन आजचे तरुण पिळदार शरीरयष्टी बनवण्याच्या नादात आपल्या आरोग्याशी खेळत आहेत. तसेच येणाऱ्या पिढीचे भविष्य उध्वस्त करत आहेत. या विरोधात जनजागृती करण्याच्या उद्देशाने ठाणे जिल्हा नॅचरल शरीरसौष्ठव संघटनेच्यावतीने ठाणे जिल्हा नॅचरल शरीरसौष्ठव स्पर्धेचे ठाण्यात आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती आज एका पत्रकार परिषदेत विनायक केतकर यांनी दिली. ठाणे जिल्ह्यातील संस्था सभासद, पंच प्रशांत केणी यांच्या पुढाकाराने आणि राईज जिम, ठाणे यांच्या विद्यमाने ठाणे जिल्हा नॅचरल शरीर शरीरसौष्ठव संघटनेच्या मान्यतेने ५ वी ठाणे जिल्हा अजिंक्यपद नॅचरल शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन ठाण्यात रविवार दि. २९ मे रोजी करण्यात आले आहे. ही स्पर्धा ठाणे जिल्हा कुस्तीगीर भवन व्यायामशाळा, गावदेवी मैदान जवळ, ठाणे येथे संपन्न होणार आहे. सायंकाळी ५.३० वाजता स्पर्धेचे उद्घटन होणार आहे. एकूण ७ गटात ही स्पर्धा संपन्न होणार आहे.
आजची तरुण पिढी जिम ला जाते. मात्र लवकर पिळदार शरीरयष्टी बनविण्यासाठी काही प्रशिक्षकांच्या नादाला लागून घातक देशी- विदेशी कंपन्यांचे सप्लिमेण्ट्री सेवन करत आहे. सप्लिमेण्ट्री हे रासायनिक असल्याने त्याचे दुष्परिमाण काही वर्षानंतर दिसून येतात. सप्लिमेण्ट्री घेलेली पिढी आणि त्यांच्या येणाऱ्या पिढीला मोठ्या प्रमाणात आरोग्याच्या दृष्टिकोनातून अनेक आजारांना बळी पडावे लागण्याची दाट शक्यता असते. म्हणूनच सप्लिमेण्ट्री विरोधात जनजागृती करण्याच्या उद्देशाने ठाणे जिल्ह्यातून एका जनजागृती मोहिमेला सुरुवात करण्यात येत आहे. ही चळवळ देशपातळीवर जावी अशी अपेक्षा विनायक केतकर यांनी व्यक्त केली. भारतात पिळदार शरीरयष्टी बनविण्यासाठी अनेक काळापासून योग्य आहार घेण्याचे सांगितले जात आहे. त्यात अंडी, दूध, फळे इत्यादींचा समावेश आहे. यालाच आम्ही प्रोत्साहन देऊन चिरकाल टिकणारी शरीरयष्टी बनविण्यासाठी मार्गदर्शन करणार असल्याचे विनायक केतकर यांनी सांगितले. तसेच ही घातक सप्लिमेण्ट्री घेऊन अनेकांना आरोग्याचे विविध विकार जडले आहेत. हे सर्व जण आपलेच बांधव आहे हा दृष्टिकोन ठेऊन त्यांना योग्य उपचार व्हावेत यासाठी नामांकित डॉक्टर, समुपदेशक यांच्या माध्यमातून मदत करणार असल्याचे विनायक केतकर यांनी सांगितले.
