शेकडो सायकलस्वारांना ठाण्यातच अडवले
- केंद्रीय मंत्र्यांना ठाण्यात अडवणार- परांजपे
- मोदींनी जनतेला महागाईने मारले- शेख
प्रतिनिधी , ठाणे : लॉकडाऊनपासून आतापर्यंत सुमारे अकरा वेळा इंधनाच्या दरामध्ये वाढ झाली आहे. कोरोनामुळे सामान्य माणूस मेटाकुटीला आलेला असताना इंधनाच्या दरवाढीमुळे महागाईत वाढ होऊन सामान्यांना जगणे नकोसे झाले आहे. भाजपच्या महाराष्ट्रातील पुढार्यांना ही दरवाढ दिसत नाही, असा आरोप करीत देवेंद्र फडणवीस यांनाच निवेदन देऊन त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इंधन दरवाढ कमी करण्यासाठी विनंती करावी, या मागणीसाठी ठाण्यातील शेकडो राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सायकल मोर्चा काढला. मात्र, ठाणे पोलिसांनी या मोर्चेकर्यांना नितीन कंपनी सिग्नल येथेच अडवून ताब्यात घेतले.
अच्छे दिनचे स्वप्न दाखवित केंद्रात सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदी यांच्या सरकारने देशात महागाईचा आगडोंब उसळविला आहे. पेट्रोल पंप म्हणजे ‘मोदी वसुली केंद्र’ झाले आहेत. या दरवाढीचा निषेध करण्यासाठी ठाण्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादीचे युवा प्रदेशाध्यक्ष महेबून शेख, शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि ठाणे युवक अध्यक्ष विक्रम खामकर यांच्या नेतृत्वाखाली सायकल मोर्चा काढण्यात आला.
पेट्रोल आणि डिझेलच्या दराने उच्चांक गाठला असून, सध्या पेट्रोलने नव्वदी पार केली आहे. केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलचे दर नियंत्रणमुक्त केल्यामुळे पेट्रोलियम कंपन्या रोज पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत बदल करीत असतात. पेट्रोलची मूळ किंमत कमी असताना जास्त दराने विक्री करून जनतेची आर्थिक लूट केली जात आहे. रोजच्या रोज दरवाढ करण्याऐवजी तीन महिन्यांनी दरांमध्ये फरक करावा. पेट्रोल-डिझेलचे इतर कर काढून वस्तू व सेवा कराच्या कार्यकक्षेत घ्यावे, तसेच महाराष्ट्र व लगतच्या राज्यातील पेट्रोल-डिझेलची किंमत एकसमान करावी अशा मागण्या अनेकवेळा करण्यात आलेल्या असतानाही त्याकडे दुर्लक्ष करण्यात केंद्र सरकार माहिर झाले आहे. आजवर केलेल्या आंदोलनांची निवेदने जिल्हाधिकार्यांच्या माध्यमातून पंतप्रधानांना पाठविण्यात आलेली आहेत. मात्र, त्यांची दखल घेतली जात नसल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठाणे ते मुंबई भाजप प्रदेश कार्यालय असे सायकल मोर्चाचे नियोजन केले होते. या मोर्चासाठी राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख हे उपस्थित होते.
यावेळी सुमारे 500 कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयापासून मुंबईच्या दिशेने सायकल चालवित कूच केले. या आंदोलनात युवकांसह युवती, महिलांचाही मोठा सहभाग होता. मात्र, नितीन कंपनी जंक्शन जवळ पोलिसांनी मोर्चेकर्यांना अडवून पुढे जाफ दिले नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी तिथेच जोरदार घोषणाबाजी करीत रस्ता अडवून धरला.
यावेळी मेहबूब शेख यांनी सांगितले की, बहोत हो गयी महंगाई की मार.. अशी घोषणा देत मोदी सरकार सत्तेवर आले आहे. याच मोदी सरकारने सामान्यांचे जगणे अवघड करुन ठेवले आहे. सर्वसामान्यांच्या खिशावर दरोडा घालण्याचा प्रकार मोदी सरकारने केला आहे. क्रूड ऑईलच्या किमती कमी झालेल्या असतानाही इंधनाचे दर वाढवून मोदी सरकार सामान्यांचे कंबरडे मोडत आहे. भविष्यात जर हे दर कमी केले नाही. तर केंद्रीय मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही. तर, आनंद परांजपे यांनी ज्यावेळी क्रूड तेलाच्या किमती वाढलेल्या होत्या तसेच साठवण क्षमता कमी होती. तेव्हा म्हणजे आघाडी सरकारच्या काळात इंधनाचे दर आवाक्यात होते. मात्र आता क्रूड तेलाच्या किमती कमी झालेल्या असताना तसेच साठवण क्षमता वाढलेली असतानाही इंधनाचे दर दररोज वाढतच आहेत. आज रोजी पेट्रोलचे दर 91.18 रूपये तर डिझेलचे दर 81.44 रुपयांवर गेले आहेत. इंधनाचे दर कमी करण्यासाठी अनेकदा निवेदने दिली आहेत. मात्र, केंद्र सरकार त्याकडे लक्ष देत नाही. म्हणूनच मोदी साहेबांचे विश्वासू शिलेदार म्हणून आम्ही आपणालाच साकडे घालत आहोत. जर, हे दर कमी केले नाहीत; तर, ठाण्यात एकाही केंद्रीय मंत्र्याला येऊ देणार नाही, असा इशारा दिला.या आंदोलनात …………………………………….. आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
