प्रतिनिधी, बीड : माझ्या सुनेच्या खांद्यावर बंदूक ठेवून माझं राजकारण संपविण्याचे षडयंत्र रचले जात आहे. माझी सून अनभिज्ञ असून आमचा कसलाही कौटुंबिक वाद नाही, असा खुलासा करत माझे सहकारी पदाधिकारीच कटकारस्थान रचत असल्याचा गंभीर आरोप बीडच्या राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्षा संगीता तुपसागर यांनी केलाय. सुनेचा छळ केल्याप्रकरणी त्यांच्यावर अंबाजोगाई शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर तुपसागर यांनी माध्यमांसमोर येऊन या वादावर पडदा टाकला आहे.
संगीता तुपसागर ह्या बीड जिल्हा राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा आहेत. सुनेचा छळ केल्याप्रकरणी त्यांच्यावर काही दिवसांपूर्वी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान संगीता तुपसागर यांनी पत्रकार परिषद घेऊन या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
