प्रतिनिधी , भंडारा : धनगर समाजाच्या आरक्षणाला समर्थन दिल्याबद्दल संतापलेल्या आदिवासी बांधवांनी भंडारा विश्राम गृह परिसरात भंडारा-गोंदिया विधानपरिषद सदस्य आमदार परिणय फुके यांचा पुतळा जाळुन जोरदार घोषणाबाजी करीत आपला संताप व्यक्त केला. यावेळी आमदार परिणय फुके यांच्या पुतळ्याला लाथा, बुक्या मारत पुतळयाचे दहन करण्यात आले.
धनगर समाजाच्या आरक्षणाची अमंलबजावणी व्हावी, यासाठी भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधिमंडळ परिसरात अनोखे आंदोलन केले होते. यावेळी आमदार परिणय फुके यांनी स्वतः उपस्थित राहून या आंदोलनाला समर्थन दिले आहे. मूळ आदिवासी यांची संस्कृती व चालीरीती वेगळ्या असून त्यांच्या आरक्षणाला धक्का लावत आमदार परिणय फुके धनगर समाजाला आदिवासी समाजात स्थान देत असल्याचा आरोप अखिल आदिवासी विकास युवा परिषद संघटनेने केला आहे.
