प्रतिनिधी , दिग्रस मतदारसंघाचे आमदार माजी मंत्री संजय राठोड यांच्या वाहनासमोर एक दिव्यांग युवक झोपून अचानक आडवा झाल्याने एकच खळबळ उडाली मात्र आपल्या भागातील रस्त्याचे प्रलंबित कामासाठी त्याने हे पाऊल उचलले आणि लागलीच वाहन थांबवून चर्चेचे आश्वासन संजय राठोड यांनी दिले.
आमदार संजय राठोड दिग्रस विश्रामगृहावर जनतेच्या समस्या ऐकण्यासाठी आले असता भेट न झाल्याने वैभव नगरातील एका दिव्यांगाने चक्क झोपून आमदार संजय राठोड यांची गाडी शासकीय विश्रामगृहातुन बाहेर निघता वेळी अडविली. ही घटना शुक्रवारी दुपारी दरम्यान घडली. वैभव नगरातील भास्कर वाघमारे हा दिव्यांग युवक राठोडांच्या भेटीसाठी आपली समस्या घेऊन आला होता. मात्र बराच कालावधी होऊन त्याला भेट मिळाली नाही. अशात आमदार राठोड हे विश्रामगृह बाहेरच्या दिशेने वाहन घेऊन निघाल्याने दिव्यांग भास्करने राठोडांच्या वाहनापुढे चक्क झोपून त्यांचा रस्ता अडविला.यावेळी लागलीच पोलिसांनी वाघमारे यास उठवून आमदार राठोड यांचेकडे घेऊन गेले. यावेळी भास्कर वाघमारे याने एकवेळ वैभव नगर येथे भेट देऊन नगरसेवकांनी केलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाची पाहणी करावी, अशी मागणी केली.
