प्रतिनिधी , नागपूर : नागपूर पोलिस विभागातील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कुकृत्ये थांबण्याचे नाव नाही. लॉकडाउनदरम्यान संपूर्ण शहर पोलिस रस्त्यांवर असतानाच सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या कार्यालयातील तीन ते चार कर्मचाऱ्यांनी चक्क कार्यालयालयात दारू व मटण पार्टी केल्याची धक्कादायक घटना समोर आली. या पार्टीचा व्हीडिओही व्हायरल झाला असून, या व्हीडिओमुळे नागपूर पोलिसांची प्रतिमा पुन्हा एकदा मलिन झाली आहे.काही दिवसांपूर्वी कार्यालयातील अन्य कर्मचारी गेल्यानंतर रात्रीच्या सुमारास निळा शर्ट घातलेला एका युवक दारूच्या बाटल्या व मटण घेऊन शांतीनगरमधील लकडगंज सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या कार्यालयात आला. त्याने खिश्यातून दारुच्या तीन बाटल्या काढल्या. या बाटल्या त्याने एका कर्मचाऱ्याच्या टेबलावर ठेवल्या. त्यानंतर कार्यालयातील तीन कर्मचारी व युवकाने सुमारे दोन तासांपर्यंत दारु व मटणची पार्टी केली. यावेळी तीन कर्मचाऱ्यांनी युवकाला काही तरी काम करून देण्याचे आश्वासनही दिले. सहा मिनिटांचा हा व्हीडिओ समाजमाध्यमांवर व्हायरला झाला. हा व्हीडिओ नेमका केव्हाचा आहे, हे मात्र कळू शकले नाही. या चित्रफितीमुळे पुन्हा एकदा पोलिसांच्या प्रतिमेला धक्का बसला आहे.
