प्रतिनिधी, बुलढाणा : राजस्थानमधील उदयपूर येथे शिंपी कन्हैया लालच्या निर्घृण हत्येविरोधात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी खामगावात निदर्शने केली आणि राष्ट्रपतींना उद्देशून उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले. विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचे विदर्भ प्रमुख अमोल अंधारे यांच्या नेतृत्वात पार पडलेल्या या आंदोलनात भारतीय जनता पक्षाच्या माजी राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या पाठिंब्यामुळे शिंपी कन्हैया लाल यांची राजस्थानमधील उदयपूरमध्ये दोघांनी तालिबानच्या धर्तीवर निर्घृण हत्या केली. यासाठी विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्या कडून या घटनेचा तीव्र निषेध करीत खामगांव उपविभागीय अधिकारी कार्यलयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी मारेकऱ्यांचा फोटोला जोडे मारून प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी राष्ट्रपती यांना पाठविलेल्या निवेदनात नमूद केले आहे कि, ही पहिली घटना नाही की याआधीही अनेक लोकांचा बळी गेला आहे. तसेच काही दिवसांपूर्वी विदर्भातील अमरावती या शहरात सुद्धा अशाच एका टेलरची हत्यासुद्धा करण्यात आली होती या सर्व मारेकऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा या प्रकरणाचा निकाल हा फास्टट्रॅक कोर्टातून चालवावा अशी मागणी करण्यात आली. तसेच राजस्थान सरकारने मृत कन्हैया लाल दर्जीच्या कुटुंबाला ३१ लाख रुपयांची जी मदत जाहीर केली आहे यामध्ये वाढ करून त्यांच्या कुटुंबाला पाच कोटी रुपये देण्यात यावे आणि कुटुंबातील सदस्यांना सरकारी नोकरी देण्यात यावी अशी मागणी या निवेदनाद्वारे विश्व हिंदू परिषद व बजरंग दल तर्फे करण्यात आली.
