जनतेज न्युज

चांदूर रेल्वे न. प. मध्ये मुख्याधिकारी यांच्या दालनासमोर भाजपा नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन

प्रतिनिधी , अमरावती : अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथील समस्यांसंदर्भात भाजपा नगरसेवकांनी बुधवारी मुख्याधिकारी ह्या अनुपस्थित असल्यामुळे व त्यांच्या दालनाला कुलूप असल्यामुळे थेट त्यांच्या दालना समोरच ठिय्या आंदोलन केले. व जोपर्यंत सकारात्मक चर्चा करून मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार केला. भाजपा नगरसेवक अजय हजारे व नगरसेविका सौ. सुरेखा विलास तांडेकर हे आंदोलनात सहभागी झाले होते.
१४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून करण्यात आलेल्या वृक्षारोपणामध्ये शासनाच्या पैशाचा नगरपरिषद कडून गैरवापर झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. व झाडे लावतांना खड्डे खोदल्यानंतर नियमाप्रमाणे सर्व गोष्टी योग्य केल्या का ? हे पाहण्यासाठी २ – ३ झाडे खोदून दाखविण्याची मागणी भाजपा नगरसेवकांनी केली असता त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ होत आहे. त्यामुळे यात काहीतरी गौडबंगाल असुन याची संपूर्ण चौकशी करण्यात यावी, दैनंदिन सफाई कंत्राटी कामगारांची उपस्थिती भाजपा नगरसेवकांनी हजेरी नुसार तपासली असता प्रत्यक्षात एका दिवशी १२ मजूर कमी आढळले. त्यामुळे दररोज कितीतरी मजूर कामावर कमी राहत असतांनासुद्धा परस्पर देयके काढल्याचा आरोप करीत सदर कामाची दैनिक हजेरी ची माहिती व कामगारांचा पगार जमा करण्याची माहिती देण्याची मागणी करण्यात आली.