जनतेज न्युज

जमिनीतील ओलाव्याच्या खोलीनुसारच पेरणी करण्याचा निर्णय घ्या- डॉ.भरत गिते, वरिष्ठ कृषी संशोधक

प्रतिनिधी, वाशिम : वाशीम जिल्ह्यात गत आठवड्यात पाऊस झाल्याने जिल्ह्यातील बहुतांश भागात शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे.मात्र अजूनही जिल्ह्यातील काही भागात पेरणीयोग्य पाऊस न झाल्याने पेरणीची घाई न करण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे. पेरणी करण्यासाठी जमिनीत पुरेशी ओल असणे आवश्यक आहे. बरेच शेतकरी वळीवाचा पाऊस पडल्यावर पेरणी आटोपुन घेतात मात्र पावसाने दडी मारल्यास पिक सुकण्याचे किंबहुना दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यावर येते. त्यामुळे अलीकडे झालेल्या पावसाने जमिनीत ४ ते ६ ईंच ओलावा असल्यासच पेरणीचा निर्णय घ्यावा असे आवाहन कृषीज्ञाकडुन करण्यात येत आहे.पेरणीयोग्य पाऊस झाला की नाही याचे मापन कसे करायचे यावर आधारित प्रात्यक्षिक डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कृषी संशोधन केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.भरत गिते यांनी करून जमिनीतील ओलाव्याच्या खोली मोजण्याचे प्रात्यक्षिक यावेळी करून दाखवले. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची उपलब्धता आहे अशा ठिकाणी पिक उगवणी नंतर हलके संरक्षित ओलित करावे. तसेच उगवणीनंतर जमीनीमध्ये ओलावा टिकुन राहण्याच्या दृष्टीने व किडीचा प्रादुर्भाव कमी होण्याकरीता पिक १५ दिवसाचे झाल्यानंतर डवरणीची व इतर आंतरमशागतीची कामे करावी. ज्या भागामध्ये पुरेसा पेरणी योग्य पाऊस झालेला नाही अशा शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करु नये, जेणेकरुन दुबार पेरणीचे संकट येणार नाही, ८० ते १०० मीमी पाऊस पडलेला असतांना किंवा जमीनीमध्ये ४ ते ६ इंच ओलावा गेलेला असतांना किंवा जमीनीमध्ये टिचभर ते इतभर ओलावा गेलेला असतांना पेरणी करावी असे आवाहन सर्व शेतकरी बंधुना डॉ. प्रा. भरत गिते शास्त्रज्ञ कृषि संशोधन केंद्र वाशिम व श्री. शंकरराव तोटावार, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी वाशिम यांचे वतिने करण्यात येत आहे.