प्रतिनिधी, जळगाव : पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथे गावाच्या पूर्वेस बहुळा नदीच्या काठावर विठ्ठलाचे भक्त गोविंद महाराजाची समाधी आहे. आणि दरवर्षी आषाढी एकादशीस याठिकाणी पंचक्रोषीसह जळगाव जिल्ह्यातील व जिल्हा बाहेरील भक्तांची मांदियाळी यात्रेच्या निमित्ताने फुलेली असते. या महतीमुळे या ठिकाणाला महत्व आले असून त्यामुळेच प्रति पंढरपूर असा उल्लेख गावाचा होतो.गोविंदा महाराजाबाबत अशी आख्यायिका आहे की, त्यांचा जन्म १७८५ मध्ये एरंडोल तालुक्यातील उत्राण येथे झाला. त्यांच्या वडीलांचे नाव झेंडूला पाटील आणि आईचे नाव काशीबाई असे. होते. गोविंद महाराज लहानपणापासून विठ्ठल भक्त होते. आणि त्याचे उदा. म्हणजे वयाच्या आठव्या वर्षांपासून ते पंढरपूर वारीला जात असत. वयाच्या १० व्या वर्षी गोविंदा महाराज नियमाप्रमाणे पंढरपूर वारीस गेले असतांना महाद्वारात झालेला गर्दीत एक महिला मरण पावली. त्यावेळी गोविंद महाराजांनी साक्षात विठ्ठलला आपल्या भक्तीचा जोरावर त्या महिलेस जिवंत करावयास लावले. त्यावेळी विठ्ठल गोविंद महाराजांना म्हणाले की, आता यापुढे तो मला भेटायला येऊ नकोस दरवर्षी आषाढी एकदशीला मी तुला तुझ्या पिंपळगावला भेटायला येईल आणि त्यावेळेपासून आषाढी एकादशीच्या दिवशी दुपारी १२ वाजता विठ्ठल पिंपळगाव येथे येतात असे मानले जाते. कारण त्याच वेळेस पंढरपूरला द्वार बंद केलेले असते. दुपारी महाआरती होते. त्यावेळेस भाविकांची प्रचंड गर्दी असते. गोविंद महाराजांनी वयाच्या ४० व्या वर्षापर्यंत विठ्ठलाची साधना केली. हे करत असतांनाच त्यांनी जामनेर, उत्राण, पाळधी (पहूर), या गावात विठ्ठलाचे मंदिर बांधले तर जामनेर उत्राण आणि पिंपळगाव येथे रथोत्सव सुरु केला. गोविंदा महाराजांना तोताराम महाराज नावाचा मुलगा होता. त्यांनी ६५ अध्यायातून गोविंद चरित्र लिहले. तसेच गोविंद महाराजांचे भव्य असे समाधी मंदिर बांधले आहे. या मंदिराला ६५ चौक्या अनेक ६५ कलश आहे. देवालय ६५ बाय ६५ फुटांचे आहे. मंदिराच्या पूर्वस दोन २५ बाय ५० फुटाचे सभागृह तर एक रंगमंच आहे. महाराजांच्या दक्षिणेला पांडुरंग महाराजांची समाधी आहे . जिल्ह्यातील बऱ्याच तालुकाच्या ठिकाणाहून एकादशीनिमित्त जादा बसेस भाविकांच्या सोयीसाठी सोडल्या जातात. एकादशीनिमित्त भरणाऱ्या यात्रोत्सवात येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी, वीज मंडळ, वैद्यकीय अधिकारी, तसेच पोलीस आणि होमगार्ड, कार्यरत असते. तसेच अनेक समाजिक संस्था भाविकांसाठी मोफत चहा फराळाची सोय करतात. तसेच याठिकाणी येणाऱ्या भाविकांसाठी निवास भोजनाची सुद्धा व्यवस्था करण्यात येते. पिंपळगाव पोलीस स्टेशनच्या वतीने अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागवण्यात आलेला आहे.तसेच दुपारी बाराच्या आरतीसाठी प्रमुख उपस्थिती माजी मंत्री गिरीश महाजन व पाचोरा भडगाव चे आमदार किशोर पाटील व पाचोरा भडगाव चे माजी आमदार दिलीप वाघ व पाचोरा तालुकाध्यक्ष भाजपा अमोल शिंदे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
