जनतेज न्युज

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे देश विकायला निघाले आहेत, माजी आमदार अनिल गोटेंची टीका.

प्रतिनिधी , धुळे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार अनिल गोटे यांनी आज दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलना विषयी आपली भूमिका मांडण्यासाठी, तसेच केंद्र सरकारच्या चूकीच्या धोरणाविरोधात, धुळे येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी मोदी सरकारवर कडाडून टीका केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे देश विकायला निघाले आहेत, आणि त्यांचे महत्त्वाचे गिऱ्हाईक अदानी आणि अंबानी हे आहेत, असही ते म्हणाले. तसेच दिल्ली येथे महीन्याभरापासून पंजाब आणि हरियाणा मधील शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. आपण हे आंदोलन मोडून काढू असं जर सरकारला वाटत असेल, तर अशी दहा सरकारे खपतील पण हे आंदोलन मोडनार नाही. अशी कडाडून टीका अनिल गोटे यांनी केली आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, जो कोणी आज केंद्र सरकारच्या विरोधात आवाज उठवतो त्याच्या विरोधात ईडी ची चौकशी लावून त्याचा आवाज दाबण्याचे काम मोदी सरकार करत आहे. माझ्यामागे काय ईडी ची चौकशी लावणार माझ्यावर आधीच 6 कोटींचे कर्ज आहे. माझ्यावरील कर्ज ते भरणार असतील तर खुशाल माझ्यावर ईडी ची चौकशी लावा. असं आव्हान त्यांनी या वेळी भाजपा ला दिलं. येणाऱ्या काळात याची फार मोठी रिऍक्शन महाराष्ट्रात बघायला मिळणार असल्याचही गोटे म्हणाले.तसेच ज्या चुका इंदिरा गांधी यांनी आणीबाणीच्या काळात नकळत केल्या. त्याचं चुका भाजपाचे दोन लोकं जाणून बुजुन करत आहे. अशी प्रतिक्रियाही अनिल गोटे यांनी यावेळी दिली.