जनतेज न्युज

पुणे रेल्वे स्थानकात संशयास्पद वस्तू

प्रतिनिधी, पुणे : पुणे रेल्वे स्थानकात आज संशयास्पद वस्तू आढळून आली होती. ही वस्तू बॉम्बसदृश्य नसल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली होती.परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी ही वस्तू हस्तगत केली. त्यानंतर ते बी जे मेडिकल कॉलेजच्या खुल्या मैदानात ही वस्तू आणण्यात आली होती. बॉम्बनाशक पथकाकडून ही वस्तू खुल्या मैदानात ठेवण्यात आली होती. त्यानंतर आजूबाजूचा परिसरही रिकामी करण्यात आला होता. पन्नास ते साठ फूट अंतरवर एक वायर या वस्तूला लावण्यात आलेली. गोण्या आजूबाजूला ठेवल्याचं दिसून आलंय. त्यानंतर एक मोठा आवाज झाला.बॉम्बनाशक पथकाकडून हा स्फोट घडवून आणण्यात आला आणि ही वस्तू निकामी करण्यात आली.

पुणे रेल्वे स्टेशनवर सकाळी १०:३५ वाजण्याच्या सुमारास रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस निरीक्षक रघुवंशी यांनी पुणे लोहमार्ग पोलीस ठाणे येथे कांबळे यांना दुरध्वनीव्दारे कळविले की, पुणे रेल्वे स्टेशन येथील जनरल रिझर्वेशन काउंटर समोरील मोकळया जागेमध्ये जुन्या आगमन प्रवेशव्दाराजवळ बॉम्बसदृश्य संशयित वस्तु असल्याचे कळविले. तातडीने घटनास्थळी बॉम्बशोधक व नाशक पथक, लोहमार्ग पुणे, बॉम्ब शोधक व नाशक पथक, रेल्वे सुरक्षा बल, बॉम्ब शोधक व नाशक पथक, पुणे शहर पोलीस तसेच लोहमार्ग पुणेचे अधिकारी, रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी व पुणे शहराचे पोलीस अधिकारी घटनास्थळी उपस्थित राहिले. वरिष्ठ पोलीस अधिका-यांच्या उपस्थित संशयित वस्तुची बॉम्बशोधक व नाशक पथक व श्वान पथकाकडुन तपासणी केली असता त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा स्फोटक पदार्थ नसल्याचे तसेच त्या जिलेटीनच्या कांडया नसल्याचे व त्यांना कोणताही पावरसोर्स जोडलेला नसल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आलेले आहे. तरीही आढळलेल्या संबंधित वस्तुंची अधिक तपासणी करण्याकरिता व त्यात स्फोटक सदृश्य पदार्थ असल्याचे आढळून आल्यास ते निष्क्रिय करण्याकरिता बॉम्बशोधक व नाशक पथकाकडुन ते सुरक्षितपणे बी. जे. मेडीकल कॉलेजच्या मैदानावर नेण्यात आले. अंतिम तपासणीच्या निष्कर्षानुसार पुढील योग्य ती कार्यवाही करण्यात येत आहे.अशी माहिती यावेळी लोहमार्ग पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान, ही वस्तू बॉम्बसदृश्य नव्हती, यात जिलेटिन कांड्या नव्हत्या, तर मग बॉम्ब पथकानं ही वस्तू निकामी करण्याचं कारण काय? हे मात्र स्पष्ट होऊ शकलेलं नाही. आता पोलिसांकडून याबाबत अधिक तपास केला जातेय. मात्र तूर्तास ही वस्तू निकामी करण्यात आली आहे.