प्रतिनिधी , धुळे : पॅकिंग अन्नधान्यावर पाच टक्के जीएसटी कर आकारणी केली जात आहे केंद्राचा हा निर्णय छोट्या व्यापाऱ्यांना मारक ठरणार आहे त्यामुळे जीएसटी कर रद्द करावा अशी मागणी व्यापारी महासंघाने करीत धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात निदर्शने केली.यावेळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नितीन बंग यांनी बोलताना सांगितले की, सतत वाढत असलेल्या महागाईचा वाढत्या आलेखात आता अजून भर पडत आहे. सर्वसाधारण नागरिकांच्या दैनंदिन वापराच्या अन्नधान्यावर केंद्र शासनाने आता 5 टक्के जीएसटी कर आकारणी करणे सुरू केले आहे. यापूर्वी ब्रॅण्डेड पॅकिंगच्या अन्नधान्यावर पाच टक्के जीएसटी कर आकारणी केली जात होती, पण आता सर्वच पॅकिंगच्या अन्नधान्यावर पाच टक्के जीएसटी कर आकारणी केली जात आहे. केंद्र सरकारचा हा निर्णय छोट्या व्यापाऱ्यांना मारक ठरणार आहे, व्यापारी वर्गाला अजून एक नवीन कराचा भरणा सहन करावा लागणार आहे. यासाठी नव्याने कर सल्लागार, अकाउंटंट व संगणकाचा खर्च वाढणार आहे त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिकांनाही जादा पैसे मोजावे लागत आहे. त्यामुळे या वाढीव करामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या घरचे बजेट चुकणार आहे. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांना किमान कर कक्षेतून दूर ठेवावे अशी मागणी व्यापारी महासंघाने आज धुळे जिल्हा अधिकारी यांच्याकडे केली आहे.
