प्रतिनिधी, ठाणे : मराठी उमेदवारांना डावलल्याने मनसेचा पोस्ट ऑफिस कार्यालयावर मोर्चा
राज्यातील पोस्ट ऑफिसमध्ये भरती प्रक्रिया सुरू असून यामध्ये मराठी उमेदवारांना डावलले जात असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे.या पार्श्वभूमीवर मराठी तरुणांना प्रथम प्राधान्य द्या, या मागणीसाठी बुधवारी ठाणे स्टेशन परिसरातील पोस्ट ऑफिसवर मनसेने आंदोलन छेडून पोस्ट खात्याच्या अधिक्षकांना निवेदन देण्यात आले. यावेळी पोस्ट खात्याच्या भरतीमध्ये महाघोटाळा झाल्याचा आरोपही मनसेने केला आहे. मनसेचे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात ठाणे शहर महिला अध्यक्षा समीक्षा मार्कंडे, रवींद्र सोनार, महेश साळवी, प्रदीप सावर्डेकर, पुष्कर विचारे, आशिष डोके, अतुल गवारे आदीसह शेकडो मनसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या स्थापनेपासुनच मराठीचा मुद्दा हाती घेतला आहे. महाराष्ट्रात मराठी तरुणांचा पहिला विचार व्हायला हवा, यासाठी मनसेने रेल्वे परीक्षामध्ये आंदोलने करून केंद्र सरकारच्या विरोधात रान पेटवले होते. आता पोस्ट खात्याच्या भरतीमध्ये मराठी उमेदवारांना डावलण्याचे प्रकार सुरु झाले असुन थेट केंद्रातून यादी तयार करण्यात येत आहे. असा आरोप रविंद्र मोरे यांनी केला. केंद्रातून तयार करण्यात आलेल्या २७५ जणांच्या यादीमध्ये एकाही मराठी उमेदवारांचे नाव नसल्याने याचा जाब विचारण्यासाठी बुधवारी मनसेने थेट पोस्ट कार्यालयावर धडक मारून आंदोलन छेडले.
केंद्र सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या पोस्ट कार्यालयात सहाय्यक पोस्ट मास्तर भरती प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये मराठी उमेदवार नसणे हा सरळ सरळ भरती प्रक्रियेत ‘महा घोटाळा’ आहे, एकप्रकारे जाणीवपूर्वक मराठी मुलांवर अन्याय केला जात असल्याचा आरोप मोरे यांनी केला आहे. दरम्यान,मराठी तरुणावर अन्याय करणाऱ्या भरती प्रक्रियेला कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना यशस्वी होऊ देणार नाही.सदर भरती प्रक्रिया पुन्हा नव्याने करण्यात यावी, तोपर्यंत या भरती प्रक्रियेला स्थगिती द्यावी.अन्यथा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.असा इशारा देण्यात आला आहे
