जनतेज न्युज

प्रांताधिकाऱ्यांच्या कारभारविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा : शिवसेना गुंठेवारी संघर्ष समितीच्यावतीने आंदोलन.

प्रतिनिधी, सांगली : मिरज प्रातांधिकारी व सांगली मंडळ अधिकारी यांच्या बेकायदेशीर कामाची शासनस्तरावर चौकशी करावी, या मागणीसाठी आज शिवसेना गुंठेवारी विकास संघर्ष समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात

आला. समितीचे प्रदेशाध्यक्ष चंदन चव्हाण यांच्या नेतृत्वात निघालेल्या या मोर्चात नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.  विजयनगर चौकातून मोर्चास सुरवात झाली. विजयनगर ते जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत मोर्चा काढण्यात आला. प्रांताधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करा अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. समितीच्यावतीने आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी देण्यात आले.

मिरज-पंढरपूर महामार्गावर मक्तेदारांना गौण खनिजाबाबत ज्या प्रमाणात परवानग्या दिल्या आहेत. त्यापेक्षा जादा उत्खनन झाले आहे. मक्तेदाराला यामध्ये मोठी सूट का दिली? अनेक बळिराजाच्या जमिनी महामार्गात गेल्या आहेत. त्यांना कशा पद्धतीने पैशाचे वाटप केले आहे. याबाबत सर्व चौकशी शासनस्तरावर करणे आवश्यक आहे. तसेच कवठेमहांकाळ येथील वर्ग तीनची देवस्थानची इनाम असताना त्यामध्ये वर्ग दोन करून कुळांना पन्नास टक्के पैशाचे वाटप केले आहे. वास्तविक ही न्यायप्रविष्ट बाब आहे. तरी देखील हा कारभार प्रातांधिकार्‍यांनी केला आहे. याची चौकशी होणे आवश्यक आहे. तसेच त्यांच्या कार्यक्षेत्रात असलेल्या अनेक तलाठ्यांवर गुन्हे नोंद झाले आहेत. त्यांना पाठीशी घालून त्यांना तलाठी कार्यालये दिली गेली आहेत. नांद्रे, सावळीसह अनेक गावांत असा प्रकार झाला आहे. शिवाय अनेक जणांना सक्तीच्या रजेवर जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविले असताना त्यांना पुन्हा परत टिपण्या करायला लावून भ्रष्ट तलाठ्यांना पाठीशी घालण्याचे काम प्रातांधिकार्‍यांनी केले असल्याचा आरोप करत हा मोर्चा काढण्यात आला.