प्रतिनिधी, नागपूर : नागपूर शहरातील तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन आरोपींनी तलवारीचा धाक दाखवून एक कंपनीच्या व्यवस्थापकाकडून तीन लाख 20 हजार रुपये लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणाची तक्रार दाखल होताच तहसील पोलिसांनी अवघ्या 12 तासात आरोपींच्या मुसक्या आवळून लुटलेली रक्कम हस्तगत केली आहे. राजू उर्फ गौतम भीमराव रामटेके आणि अशोक किसन पाटील असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नावं आहेत.महत्वाचं म्हणजे राजू उर्फ गौतम हा आठ वर्षांपूर्वी गिरनार कार्गो एस्कॉर्ट सर्व्हिसच्या कार्यालय काम करायचा त्यामुळे त्याला अटक करण्यात पोलिसांना फार अडचणी आल्या नाहीत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तहसील पोलीस स्टेशन हद्दीच्या गांधीबाग येथील सिद्धिविनायक इमारतीत गिरनार कार्गो एस्कॉर्ट सर्व्हिसचे कार्यालय आहे. कंपनीचे व्यवस्थापक ओमप्रकाश हे त्यांच्या कार्यालयात काम करत असताना दोन गुंड तलवार घेऊन शिरले होते. त्या गुंडांनी व्यवस्थापकाला जबर मारहाण केली. त्यानंतर गुंडांनी तलवारीचा धाक दाखवत 3 लाख 20 हजार रुपये घेऊन पळ काढला होता. या घटने नंतर कंपनीच्या मॅनेजरने तहलील पोलीस ठाण्यात जाऊन घडलेल्या घटनेची तक्रार दाखल केली.
१२ तासात आरोपी जेरबंद:-
एकीकडे नागपूर शहराची वाटचाल क्राईम फ्री शहराच्या दिशेने सुरू होताच दिवसाढवळ्या तलवारीच्या धकावर लूट झाल्याची घटना घडली, त्यामुळे संपूर्ण पोलीस यंत्रणेत खळबळ मजली होती. आरोपींना तात्काळ अटक करण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांवर दबाव वाढला होता,मात्र पोलिसांना आरोपींचा सुगावा लागताच अवघ्या 12 तासात आरोपींना जेरबंद करण्यात तहसील पोलिसांना यश मिळाले आहे. पोलिसांनी दोनही आरोपींना अटक करून त्यांनी लुटलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे.
