प्रतिनिधी , धुळे : धुळे शहरातील स्टॅम्प वेंडर आणि दलाल यांना दस्त लिखाण करण्याची परवानगी नसताना देखील ते दस्त लिखाण करीत आहे. तसेच त्यांना दुय्यम निबंधक कार्यालयात सादर करण्याचा कोणताही अधिकार नाही, त्यामुळे महिन्याभरात त्यांचे काम थांबवावे तसेच त्यांच्या बेकायदेशीर कामावर कारवाई करावी अन्यथा धुळे जिल्हा व तालुका न्यायालयातील सर्व वकील रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा गंभीर इशारा आज धुळे बार असोसिएशनने दिला आहे. बार असोसिएशनचे अध्यक्ष एडवोकेट बी.जी पाटील यांनी यावेळेस पत्रकारांशी बोलताना सांगितले की शिरपूर, शिंदखेडा, दोंडाईचा, साक्री आणि धुळे येथील दुय्यम निबंधक कार्यालयात स्टॅम्प विक्रेता तसेच दलाल आणि एजंट हे दस्त नोंदणीसाठी कोणताही कायदेशीर अधिकार नसताना बेकायदेशीर रित्या दस्त लिहून सदर नोंदणी सादर करीत आहे. या स्टॅम्प वेंडर विक्रेतांना विक्री आणि रेव्हेन्यू तिकीट विक्री करण्याचा परवाना आहे. त्यांना दस्त तयार करणे व दस्त तयार करणारा म्हणून सही करणे तसेच दस्त नोंदणीसाठी सादर करणे असा कोणताही अधिकार नाही. स्टॅम्प विक्रेते आणि दलाल हे नियमबाह्य पद्धतीने दस्त लिहुन ते नोंदणी आणि सादरीकरणाचे काम करीत आहे. त्यांचे हे कृत्य बेकायदेशीर आहे. असे असताना ते दुय्यम निबंधक कार्यालय या ठिकाणी बेकायदेशीर रित्या वावरत असतात बेकायदेशीर दस्त नोंदणी मुळे खोटे व चुकीचे दस्त नोंदणी लिहून सामान्य जनतेची फसवणूक होत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे सदर स्टॅम्प वेंडर विरोधात कडक कारवाई करावी अशी मागणी आज धुळे जिल्हा बार असोसिएशन धुळे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
