जनतेज न्युज

भगवा ध्वज हा महाराष्ट्राच्या अस्मितेच प्रतीक आहे – महापौर नरेश म्हस्के

प्रतिनिधी, ठाणे : ठाणे महापालिकेतील नगरसेवकांचा कार्यकाळ येत्या आठवडय़ात संपुष्टात येत असताना गेल्या काही दिवसांपासून मुख्यालयात नव्यानेच उभारण्यात आलेल्या शिवशिल्पाशेजारी असलेल्या भिंतीवर फडकविण्यात आलेले दोन भले मोठे भगवे झेंडे अनेकांचे लक्ष वेधून घेऊ लागले आहेत. मुख्यालयांच्या प्रवेशद्वारावर वाघाचे चित्रही रेखाटण्यात आले असून भिंतीवर भगवा आणि प्रवेशद्वारावरील वाघामुळे शहरातील राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. ठाणे महापालिका मुख्यालय इमारतीवर यापूर्वीच शिवशिल्पाची प्रतिकृती उभारण्यात आली होती. ही प्रतिकृती जुनी असल्यामुळे ती धोकादायक बनली होती. यामुळे ही प्रतिकृती काढून त्या जागी नवीन शिवशिल्पाची प्रतिकृती उभारणीची मागणी होत होती. ही मागणी मान्य करत तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या कामाचा प्रस्ताव तयार केला होता. तसेच त्यासाठी निधीचीही तरतूद केली होती. सत्ताधारी शिवसेनाही या नव्या शिल्पांच्या उभारणीसाठी आग्रही होती. या प्रस्तावास मान्यता मिळाल्यानंतर जुनी प्रतिकृती काढून नवीन शिवशिल्प उभारणीचे काम हाती घेण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी हे काम पूर्ण होताच त्याचे लोकार्पण करण्यात आले.ठाणे महापालिकेतील नगरसेवकांचा कार्यकाळ येत्या ५ मार्च रोजी संपुष्टात येत आहे. हा कार्यकाळ संपण्यापूर्वी शहरात वेगवेगळय़ा विकासकामांच्या शुभारंभाचा धडाका लावण्यात आला आहे. ओबीसी   आरक्षणाचा तिढा संपुष्टात आला तर एप्रिल महिन्याच्या अखेरीस महापालिका निवडणुकाही जाहीर होतील अशीच चर्चा आहे. ठाणे जिल्ह्यातील वेगवेगळय़ा महापालिकांमध्ये राजकीय पातळय़ांवर यासाठी तयारीही सुरू आहे. असे असताना शिवशिल्पांच्या निमित्ताने मुख्यालयांच्या भिंतीवर फडकलेला भगवा लक्षवेधी ठरला आहे.