जनतेज न्युज

महापालिकेकडून पुस्तक बँक सुरू : आयुक्त कापडणीस यांनीही केली पुस्तके दान: पुस्तके दान करण्याचे मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांचे आवाहन

प्रतिनिधी , सांगली : सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना वाचनाची मेजवानी देण्याच्या उद्देशाने महापालिका प्रशासनाकडून पुस्तक बँक सुरू केली जात आहे. या पुस्तक बँकेत नागरिकांनी पुस्तके दान करावीत असे आवाहन मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे. आज आयुक्त कापडणीस यांनीही आपल्याकडील पुस्तके मनपाच्या ग्रंथालय विभागाला दान केली आहेत.
महापालिकेचे वि स खांडेकर वाचनालयाबरोबर अन्य वाचनालयाचे आधुनिकीकरण केले जात आहे. त्यामुळे या वाचनालयामध्ये वाचकांना पुस्तकांचा खजाना उपलब्ध व्हावा या उद्देशाने स्वच्छ सर्वेक्षण 2021 व माझी वसुंधरा अंतर्गत सांगली-मिरज-कुपवाड  महानगरपालिकेने पुस्तक दान सर्व श्रेष्ठदान हा उपक्रम हाती घेतला आहे. यानंतर्गत आपण वापरत नसलेल्या पुस्तकांचा इतर लोकांना आणि विद्यार्थ्यांना उपयोग होण्यासाठी महापालिकेचे एक महत्वपूर्ण पाऊल उचलले असून ज्यांना महापालिकेच्या पुस्तक बँकेत आपली पुस्तके दान करायची आहेत. त्यांनी महापालिकेच्या वि स खांडेकर वाचनालयात असणाऱ्या वाचनालय विभागाशी संपर्क साधून जमा करावीत जेणेकरून आपण दान केलेल्या पुस्तकाचा उपयोग वाचकांना होईल असे आवाहनही मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे. अशी माहिती ग्रंथपाल एस एस पुदाले यांनी दिली