प्रतिनिधी , औरंगाबाद : प्राचीन काळापासून मोत्यांचे प्रत्येकालाच आकर्षण आहे. या मोत्यांचा उपयोग आयुर्वेद औषधी, आभूषण यामध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. १२ महिन्यात मोत्यांचे चांगले उत्पादन केल्यास शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो. यामध्ये पांढरा, गोल आणि काळा मोती यास जागतिक बाजारपेठेत मोठी मागणी असून शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मोत्यांचे उत्पादन फायदेशीर ठरू शकते असा विश्वास इंडो-पर्ल मोती उत्पादनाचे संचालक अरुण नागोराव अंभोरे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
इंडो-पर्ल या नावाने औरंगाबादेत कुंभेफळ येथे कंपनी स्थापन करून गेल्या अनेक वर्षापासून मोत्यांचे विक्रमी उत्पादन केले जाते. यामुळे शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फायदा तसेच अनेकांच्या हाताला रोजगार उपलब्ध झाला असल्याचे समाधान अरुण अंभोरे यांनी पत्रकार परिषदेत बोलतांना व्यक्त केले. आपल्या शेतामध्ये शेततळे निर्माण करून कमी खर्चात अधिक उत्पादन शेतकऱ्यांना केवळ १२ महिन्यात मिळते. नैसर्गिक शिंपल्यात मोत्यांची निर्मिती होत असल्याने चांगले बीजारोपण करता येते. यामध्ये ४ प्रकारचे मोती उत्पादन करता येत असल्याने पांढरा मोती, काळा मोती, गोल मोती, यासह आभूषणासाठी विविध मोत्यांचे उत्पादन शास्रशुद्ध पद्धतीने शेतकऱ्यांना घेता येते. मोती कसा तयार होतो. काय तयारी करावी लागते याची माहिती अरुण अंभोरे यांनी दिली.
चायना, जपान या देशामध्ये जगाच्या उत्पादनाच्या तुलनेत ८० टक्के एवढे चांगले विक्रमी उत्पादन शेतकऱ्यांना आपली शेती करून घेता येऊ शकते. आयुर्वेदामध्ये औषधी निर्माण करण्यासाठी, आभूषणामध्ये विविध अलंकार मध्ये मोत्यांचा मोठ्या प्रमाणात आकर्षकरीत्या उपयोग केला जातो. समुद्रामध्ये नैसर्गिक रित्या हे उत्पादन मिळत असल्याने समुद्राच्या पाण्यात आणि गोड्या पाण्यातही हे उत्पादन घेता येते असे अरुण अंभोरे यांनी स्पष्ट केले. ओरिसा येथे भुवनेश्वर येथील सेन्ट्रल इंस्टीट्युट ऑफ फ्रेश वाटर म्हणजेच सिफा येथे जाऊन मी मोती उत्पादनाचे प्रशिक्षण घेतले. त्यामुळे मोत्यांची शेती यशस्वीपणे करू शकतो याचा मला विश्वास निर्माण झाल्याचे अरुण अंभोरे म्हणाले. शिंपले कोणत्या प्रकारचे निवडावे, त्यास लागणारे शुद्ध खाद्य, कोणत्या वातावरणात ते चांगल्या प्रकारे संवर्धित होऊ शकतात, याचा मी सूक्ष्म अभ्यास केला. आणि गेल्या ४ वर्षापासून मी शेततळ्यामध्ये याचे उत्पादन इंडो-पर्ल या कंपनी मार्फत करू लागलो.
मोती उत्पादनातील सर्व त्रुटी, अडथळे दूर करून मी प्रायोगिक तत्वावर व्यापक प्रमाणात शेतकऱ्यांना सोबत घेत, इंडो-पर्ल हि कंपनी स्थापन करुन यामध्ये मोत्यांचे उत्पादन सुरु केले. आज महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक या तीन राज्यात मोत्यांचे उत्पादन इंडो पर्ल मार्फत केले जाते. मोत्यांची शेती करण्यासाठी ० मेंटेनन्स लागते. या कंपनीत गोल मोती, मेटल उत्तक मोती, काळा मोती याचे उत्पादन केले जाते. इंडो पर्ल येथे मोत्यांचे उत्पादन कसे करावे याचेही प्रशिक्षण दिल्या जाते. याबाबत अधिक माहिती शेतकऱ्यापर्यंत पोहोचावी यासाठी विविध कार्यशाळा, शिबिरे घेतली जातात. शेतकऱ्यांना शासनाकडून अनुदान मिळावे आणि मोती उत्पादनात भारत जागतिक बाजारपेठेत अग्रक्रमात राहावा यासाठी माझा प्रयत्न असून भविष्यात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पर्ल फार्मिंग मध्ये येऊन आपला आर्थिक विकास करावा, अशी अपेक्षा यावेळी इंडो-पर्ल मोती उत्पादनाचे संचालक अरुण अंभोरे यांनी व्यक्त केली.
