प्रतिनिधी, पुणे : नॅशनल हेराल्ड आर्थिक घोटाळा प्रकरणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना अटक होण्याची शक्यता आहे. सोमवार, मंगळवार आणि आज बुधवारी असे सलग तीन दिवस राहुल गांधी यांची ईडीने चौकशीचा ससेमिरा लावला आहे. आज बुधवारी (१५ जून) राहुल गांधी यांची चौकशी पूर्ण होऊन त्यांना कधीही अटक केली जाऊ शकते अशी बातमी माध्यमांमध्ये येताच पुण्यातील काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी बालगंधर्व चौकात आंदोलन सुरू केले.
यावेळी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच टायरही जाळण्यात आला. पोलिसांनी वेळीच येऊन टायर विझवला. मात्र जर राहुल गांधी यांना अटक झाली तर हे आंदोलन पेटेल अशी भूमिका उपस्थित काँग्रेस कार्यकर्त्यांनी घेतली. या आंदोलनात काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे, माजी अध्यक्ष रमेश बागवे, संगीता तिवारी, कमल व्यवहारे आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
