जनतेज न्युज

वीज पुरवठा खंडित केल्याने उभी पिकं जळण्याची भीती, पुरवठा पूर्ववत करा शेतकऱ्यांची मागणी

प्रतिनिधी ,पंढरपूर:- करमाळा तालुक्यातील वीज वितरण कंपनीने शेती पंप तसेच घरगुती वीज कनेक्शन वीज बिल भरले नसल्याने तोडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना भरपूर त्रास सहन करावा लागत आहे. उभी पिकं जळण्याची भीती शेतकरी व्यक्त करताहेत. घोटी गावचे सरपंच सचिन पाटील यांनी आम्ही लाईट बिल भरण्यासाठी तयार आहोत परंतु त्यासाठी सवलत द्यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.

सद्यस्थितीत शेतकऱ्यांचा माल अजून शेतीमध्येच आहे. तसेच ऊस बिल मिळालेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक तारांबळ उडाली आहे आणि या स्थितीत वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वीज कनेक्शन तोडलेले आहेत पाथुर्डी, घोटी, वरकुटे, साडे, नेरले या भागातील फळ,भाज्यांचे तसेच पिकांचे भरपूर नुकसान होत आहे.यावेळी शेतकरी यांनी वीज कनेक्शन लगेच सुरळीत करा अन्यथा पिकांचे पंचनामे करा अशी मागणी केली आहे.पाणी असताना देखील वीज पुरवठा खंडित केल्यामुळे आज बळीराजा अडचणीत आला आहे.