प्रतिनिधि , सोलापुर : सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी श्रीसिध्दरामेश्वरांच्या अक्षता सोहळ्यानंतर दुसऱ्या दिवशी होम प्रदीपन विधी पार पडला. सिद्धरामेश्वरांचा जयघोष करत होम मैदानावर होमप्रदीपनाचा सोहळा संपन्न झाला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या यात्रेत केवळ 50 मानकरी, पुजाऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. दरवर्षी हजारो लोकांच्या उपस्थिती अक्षता सोहळा आणि होम प्रदीपन सोहळा पार पडत असतो.
यंदा मात्र भक्तांविना होम मैदान सुनं पडलं होतं.
त्यामुळे सोलापूरच्या इतिहासात पहिल्यांदाच अतिशय कमी भाविकांच्या उपस्थितीमध्ये होमप्रदीपन विधी पार पडला.
धार्मिक विधी मात्र परंपरेप्रमाणे पार पडल्या,
यामध्ये बाजरीच्या पाच पेंड्यांना साडी,चोळी,खण आणि मंगल चिन्हाचा वापर करुन कुंभार कन्येचे रुप देण्यात येते.
त्यानंतर मानकरी फळांचा वर्षाव करतात.
कुंभार वाड्यातून कुंभार कन्येचे वंशज काळा माठ आणतात. त्यानंतर मानकरी हिरेहब्बू पुजा करुन हा होमप्रदीपन विधी पार पडला.
होम प्रदीपन पार पडल्यानंतरच सोलापूरकर एकमेकांना तिळगूळ देऊन आनंद साजरा करतात.
