प्रतिनिधी , नवी मुंबई : 2018 साली सिडको ने काढलेल्या 14500 घरांमधून शिल्लक घरांमधील 4426 घरांची सोडत पोलिसांसाठी काढण्यात आली. या घरांच्या सोडतीच्या माध्यमातून सिडको ने पोलिस बांधवांची फसवणूक केली असल्याचा आरोप नवी मुंबई मनसेतर्फे करण्यात आलाय. 2018 साली या घरांची किंमत जेवढी होती त्यापेक्षा तब्बल 2 ते 3 लाख रुपये अधिक किंमतीत ह्या घरांची विक्री सिडको करत आहे. त्यामुळे कोविड योद्धा म्हणून सन्मान करण्यात येणाऱ्या पोलिसांना 2018 साली ज्या किंमतीत घरांची विक्री करण्यात आली त्याच किंमतीत आता ही घर देण्यात यावी अशी मागणी मनसे तर्फे करण्यात आलेय. याविषयी सिडको व्यवस्थापकीय संचालक तसेच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असून मागणी मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा मनसे तर्फे देण्यात आलाय.
