प्रतिनिधी, मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते आंबेडकर भवन, मुंबई येथे दोन रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले. वंचित बहुजन आघाडी कुर्ला तालुका अध्यक्ष स्वप्नील जवळगेकर आणि वॉर्ड क्रमांक १६० महासचिव स्वप्नील वाघमारे यांच्या माध्यमातून रुग्णवाहिका सेवा सुरू करण्यात आली आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर, पक्षाच्या नेत्या अंजलीताई आंबेडकर, मुंबई प्रदेशाध्यक्ष अबुल हसन खान, महिला आघाडीच्या मुंबई प्रदेशाध्यक्ष सुनीता गायकवाड तसेच मुंबईतील कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. मुंबईतील सर्वसामान्य रुग्णांच्या सेवेसाठी रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देणाऱ्या दोन्ही पदाधिकारी आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या सर्व कार्यकर्ते, हितचिंतक यांचे यावेळी बाळासाहेब आंबेडकर यांनी कौतुक केले.
