प्रतिनिधी, धुळे : डोंगराळे ता. मालेगांव येथे जैतोबा महाराज यांच्या यात्रा उत्साहात झालेल्या तुफान हाणामारीमध्ये एका इसमाचा खून झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. खुनाचा गुन्ह्यात फरार असलेला संशयीत आरोपीला जेरबंद करण्यात धुळे तालुका पोलिसांना यश आले आहे. गोकुळ अहिरे असे आरोपीचे नाव असून तो धुळे तालुक्यातील चितोड गावाचा राहणारा आहे.
मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावाजवळील जैतोबा महाराज देवाच्या यात्रा उत्सवला कोरोनामुळे दोन वर्षापासून बंदी घालण्यात आली होती, मात्र यंदा ही यात्रा उत्साहात साजरी झाली यावेळी हजारो भाविकांनी जैतोबा महाराज यात्रा उत्साहात सहभाग घेतला होता. याच यात्रा उत्सव दरम्यान किरकोळ कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी होवून त्यात एका इसमाचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती. जैतोबा महाराज देवाच्या यात्रेत झालेल्या हाणामारी मध्ये एकाचा खून झाल्याचे धुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली होती. या खुनाच्या घटनेचा मालेगांव तालुका पोलीस ठाण्यात भादंवी कलम ३०२, ३०७, ३५४ सह अनुसुचित जाती जमाती कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी गोकुळ श्रावण अहिरे धुळे तालुक्यातील चितोड गावात असल्याची गोपनीय माहिती धुळे तालुका पोलिसांना मिळाली, त्या माहितीच्या आधारे धुळे तालुका पोलिसांनी सापळा रचत अगदी सीताफिने या खुनाच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी असलेला गोकुळ श्रावण आहीरे याला ताब्यात घेतले असून पुढील कारवाईसाठी त्याला मालेगाव तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी दिली आहे.
