जनतेज न्युज

तोतया सीआयडी पोलिसांकडून व्यापाऱ्याचे अपहरण करण्याचा प्रयत्न फसला

प्रतिनिधी, धुळे : सीआयडी नाशिक स्पेशल पोलीस असल्याचे म्हणत खारीपाडा येथील व्यापाऱ्याच्या घरात घुसलेल्या सात जणांनी व्यापाराच्या घराची झडती घेत पैशांसाठी व्यापाराचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी व्यापाऱ्याकडून 80 हजारांचे चांदीचे दागिने या तोतया पोलिसांनी घेऊन पोबारा करण्याचा प्रयत्न केला, मात्र व्यापाराच्या पत्नीने आरडाओरडा केल्यामुळे ग्रामस्थांनी या तोतया पोलिसांना आडवले मात्र ते गावकऱ्यांच्या हातून अंधाराचा फायदा घेत निसटले. पोलिसांनी वेळीच नाकाबंदी करत या सात जणांपैकी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. सीआयडी असल्याची बतावणी करत लूट करणाऱ्या पाच जणांच्या शिरपूर तालुका पोलिसांनी 24 तासाच्या आत मुसक्या आवळत चोरीचा छडा लावला आहे. शिरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये उमरगा या ठिकाणी आपण सीआयडी असल्याची बतावणी करत चोरट्यांनी व्यापाऱ्याच्या घरी रात्री दहा वाजता जाऊन कुटुंबीयांना कारवाईची धमकी देत लूट केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. त्या संदर्भात शिरपूर तालुका पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देखील दाखल करण्यात आली होती. तक्रारीच्या अनुषंगाने शिरपूर तालुका पोलिसांनी नाकाबंदी करत सात पैकी पाच चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. कारवाईदरम्यान चोरट्यांनी नेलेला मुद्देमाल देखील पोलिसांनी हस्तगत केला आहे. यापैकी आणखी दोन चोरटे पसार असून त्यांच्यासाठी एक पथक तैनात करण्यात आले असून ते देखील काही दिवसात गजाआड असतील, असा विश्वास पोलीस प्रशासना कडून व्यक्त करण्यात आला आहे. या कारवाई संदर्भात पोलिस अधीक्षक प्रवीण कुमार पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन या कारवाई संदर्भातील माहिती दिली आहे.