प्रतिनिधी , कल्याण डोंबिवली : शिवसेनेचे कल्याण जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत शिंदे गटासोबत हात मिळवणी
शिवसेनेला वारंवार एकामागे एक झटके लागत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 39 आमदारांसह बंडखोरी केल्यानंतर अनेक पदाधिकारी शिंदे गटाला पाठिंबा देत आहेत. दुसरीकडे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडून आपल्या नेतृत्वात असलेली शिवसेनाच खरी असल्याचा दावा केला जातोय. तर एकनाथ शिंदे यांच्याकडून आपला गटच खरी शिवसेना असल्याचा दावा केला जातोय. विशेष म्हणजे शिंदे गटाला राज्यभरातून चांगली साथ मिळत आहे. तरीही काही कट्टर शिवसैनिक हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचं मानलं जात आहे. शिवसेनेमधील कार्यकर्त्यांना थांबवण्यासाठी शिवसेनेचे सगळे नेते पदाधिकारी जोमात कामाला लागले असून आज शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर जिल्हाप्रमुख आणि पदाधिका-यांची बैठकीत घेत लढाईसाठी तयार राहा, असे आदेश दिले मात्र या सर्व घडामोडींदरम्यान मुख्य शिवसेनेला झटका देणारं आणखी एक वृत्त समोर आलं आहे. शिवसेनेचे कल्याण जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत शिंदे गटासोबत हातमिळवणी केली आहे.कल्याणचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी आपल्या पदाचा त्याग करत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण प्रमाण मानून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठींबा देण्याचा निर्णय घेतला आहे गोपाळ लांडगे यांचं कल्याण, डोंबिवली, कल्याण ग्रामीण आणि ठाणे जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये चांगलं प्रभुत्व आहे. त्यांनी शिंदे सेनेला साथ दिल्याने शिवसेनेला मोठं खिंडार पडल्याची चर्चा आहे कल्याण डोंबिवलीचे माजी नगरसेवक राजेश मोरे, माजी नगरसेवक विशाल पावशे, माजी नगरसेवक प्रशांत काळे यांनी देखील यापूर्वीच मुख्यमंत्री शिंदे यांना आपला पाठींबा दर्शवला आहे. तर उल्हासनगरचे माजी नगरसेवक कलवंत सिंह आणि माजी नगरसेवक अरुण आशन यांनी देखील शिंदे यांना आपला पाठिंबा दर्शवला आहे. कट्टर शिवसैनिक अशी ओळख असलेले गोपाळ लांडगे यांनीही मुख्यमंत्री शिंदे यांना पाठींबा दिल्याने कल्याण डोंबिवलीमधील शिंदे गटाची ताकद वाढली आहे.
