प्रतिनिधी, अहमदनगर : कळसूबाई शिखराच्या पायथ्याशी असलेल्या पेंडशेत शिवारात कोल्हार घोटी रस्त्यावर असलेल्या ओढ्यात औरंगाबाद येथील पर्यटकांच्या गाडीला काल रात्री साडे आठ वाजता अपघात झाला. वळणाचा अंदाज न आल्याने क्रेटा कार थेट कृष्णवंती नदी पात्रात बुडाली. या अपघातात दोन जणांचा गुदमरून मृत्यू झाला. तर तिसरा काचेतून उडी मारून बचावला. त्याच वेळी बोलेरो गाडीतून आलेला एक वृध्द पाण्याचा अंदाज न आल्याने कृष्णावंती नदीत वाहून गेला. ट्रॅक्टर आणि जेसिपिने गाडी बाहेर काढून मृतदेह शवविच्छेदनासाठी राजूर ग्रामीण रुग्णालयात आणले आहेत.औरंगाबाद येथील वकिली करत असलेले आशिष प्रभाकर पोलादकर,वय ३४ रा.पोलाद तालुका सिल्लोड, रमाकांत प्रभाकर देशमुख ३७ रा ताड पिंपळगाव, ता.कन्नड, वकील अनंत रामराव मगर वय ३६ रा.शिंगी तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली येथील युवक संगमनेरला त्यांच्या मित्राकडे कार्यक्रमानिमित्त आले होते. जवळच भंडारदरा आहे. तो पाहण्यासाठी गेले होते. त्यांना भंडारदरा येथे जायचे होते मात्र त्यांचा रस्ता चुकला ते सरळ वाकी मार्गे वारूंघुशि फाट्याच्या पुढे गेले रस्ता चुकला लक्षात आल्यावर ते रात्री साडेआठ वाजता ते कळसुबाईकडून भंडारदराच्या दिशेने येत होते. यावेळी पेंडशेत फाट्यावर एका अवघड वळणावर रस्त्याचा अंदाज न आल्याने त्यांची क्रेटा कार थेट सरकत जाऊन कृष्णवंती नदीपात्रात बुडाली. त्याच वेळी बोलेरो गाडीतून एक प्रवाशी लघु शंकेसाठी थांबला, परंतु नदीच्या पाण्याचा प्रवाहात तोही वाहून गेला आहे.आज शनिवारीही त्यांचा शोध घेण्याचे काम चालू आहे.
