प्रतिनिधी , जळगाव : आपल्या भोवती अनेक असे कलावंत असतात की जे अगदी सटरफटर काम करून आपली उपजिवीका पार पाडतात. असाच एक उपेक्षित कलावंत म्हणजे कैलास रतीराम कोळी होय. मुक्ताईनगर येथील हायवेला लागून असणार्या खानावळीत काम करणारा कैलास बासरी वादनात पारंगत आहे. कोणत्याही प्रकारे रूढ अर्थाने याचे शिक्षण न घेतांनाही त्याला यातून स्वर्गीय सूर काढता येतात. याहून महत्वाची बाब म्हणजे प्रत्येक एकादशीला तो मुक्ताई मंदिरात आपली कला सादर करतो. मुक्ताईच्या दर्शनासाठी येणारे भाविक त्याच्या बासरीचे सूर ऐकून अक्षरश: मंत्रमुग्ध होतात. मुक्ताईनगर तालुका अतिशय मातब्बर राजकारण्यांचा आहे. त्यांनी तालुक्यातील अशा उपेक्षीत कलावंतांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला तर बरे होईल. असो. आई मुक्ताईचा आशीर्वाद या कलावंताला कधी तरी नक्कीच न्याय मिळवून देईल ही अपेक्षा.
