प्रतिनिधी , मुंबई : ९ ऑगस्ट जागतिक मुलनिवासी आदिवासी दिन असून संपूर्ण जगभर आजचा दिवस आदिवासी दिन म्हणुन साजरा केला जातो. निसर्ग हाच देव मानणारा आदिवासी समाज निसर्गासोबत राहत आजही संघर्ष करतो. आदिवासी समाजाची एक वेगळी संस्कृती आहे. हिच संस्कृती आदिवासींची ओळख असून त्यांच्या चाली, रूढी, परंपरा टिकवून आहे. या आदिवासींची ओळख जगाला व्हावी त्यांच्या संस्कृतीचे दर्शन जगाला व्हावे यासाठी आज आदिवासी सह्याद्री प्रतिष्ठान तर्फे कोपरखैरणे ते वाशी भव्य सांस्कृतिक रॅली काढण्यात आली. या रॅली मध्ये आदिवासी समाजाची संस्कृती, त्यांचे राहणीमान अश्या विविध सांस्कृतिक चालीरितींचे दर्शन नवी मुंबईकरांना पहायला मिळाले. या रॅली मध्ये आदिवासी समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.
