जनतेज न्युज

पुणे महापालिकेतील तथाकथित माहिती अधिकार कार्यकर्ता रमेश खामकर याच्या अटकेसाठी पिडीत चऱ्हाटे कुटूंबियांचे जिल्हाधिकारी कार्यालयावर बेमूदत उपोषण जिल्हाधिकारी श्री.राजेश देशमुख व पोलीस आयुक्त श्री. अमिताभ गुप्ता यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन सादर

प्रतिनिधी , पुणे : पुणे महापालिकेतील सेवानिवृत्त कर्मचारी व तथाकथित माहिती अधिकार कार्यकर्ता कट्टर जातीयवादी श्री. रमेश खामकर यांच्यावर शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल होऊन देखील त्याला अटक करण्यात पुणे पोलीस टाळाटाळ करीत असल्याने, तसेच श्री. खामकर याच्या जाचाला कंटाळुन पिडीत फिर्यादी श्री. सुनिल चऱ्हाटे त्यांच्या दोन लहान मुली व पत्नीसह जिल्हाधिकारी कार्यालयावर बेमूदत धरणे आंदोलनाला बसणार असल्याची माहिती चर्मकार विकास संघाचे जिल्हाध्यक्ष संजुभाऊ बनसोडे यांनी येथे दिली आहे. तसेच पिडीत फिर्यादी श्री. सुनिल चऱ्हाटे व शिष्टमंडळाव्दारे आज जिल्हाधिकारी श्री. राजेश देशमुख व पोलीस आयुक्त श्री. अमिताभ गुप्ता यांची प्रत्यक्ष भेट घेवून त्यांना निवेदन सादर केले आहे. यावेळी जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी पुणे पोलीसांना याबाबत कळवुन आरोपींना तत्काळ अटक करण्याबाबत कळविणार असल्याचे आश्वासन दिले आहे. तसेच पोलीस आयुक्त श्री. अमिताभ गुप्ता यांची प्रत्यक्ष भेट घेतल्यानंतर, त्यांनी देखील सहायक पोलीस आयुक्त विश्रामबाग यांचेकडील काय परिस्थिती आहे हे पाहून त्याबाबत निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले असल्याची माहिती चर्मकार विकास संघाचे जिल्हाध्यक्ष संजुभाऊ बनसोड यांनी येथे दिली आहे.

याबाबत संघटनेचे अध्यक्ष श्री. संजुभाऊ बनसोड व पिडीत फिर्यादी श्री. सुनिल चऱ्हाटे यांनी जिल्हाधिकारी पुणे यांना निवेदन देवून खाली पत्रकारांशी संवाद साधला असता, ते म्हणाले की, शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. क्र. 101/2022 नुसार आरोपी नामे रमेश खामकर यांचे विरूद्ध मी अनुसूचित जाती पैकी चांभार या जातीचा असल्याने सदर आरोपीने माझे जातीयकारणाने अत्याचार करीत असल्यामुळे मी त्यांचे विरूद्ध भा.द.वी. कलम 385, 504 व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदयातील कलम  3 (1) (आर) नुसार गुन्हा दाखल आहे. परंतु सदर आज गुन्हा दाखल होवून दोन महिने उलटून गेले तरी आरोपीला अद्याप पर्यंत अटक करण्यात आलेली नाही. सदर आरोपी हा सामाजिक व आर्थिकदृष्ट्या प्रभावशाली असून माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून पैशांची मागणी करून माझे उदरनिर्वाहाचे चांभारकी गटई काम करण्यास प्रत्यक्ष – अप्रत्यक्षरित्या अडथळे निर्माण करून श्री चऱ्हाटे यांच्यावर आर्थिक संकट निर्माण केले आहे व मला पुणे महानगरपालिका शिवाजीनगर पुणे – 411005 लगत असलेल्या एलबीटी कार्यालयाच्या बाहेर माझे गटई काम करण्यास मज्जाव करून मला हस्ते परहस्ते माझे जिवितास नुकसान व मारहाण करण्याची धमकी दिली आहे. म्हणून मला  पुणे महानगरपालिका शिवाजीनगर पुणे – 411005 लगत असलेल्या एलबीटी कार्यालयाच्या बाहेर या ठिकाणी बसून गटई काम करण्यास माझ्या जिवितास व माझे गटई काम साहित्याच्या मालमत्तेस नुकसानीचा धोका आहे.  त्यामुळे माझे कुटूंबावर आर्थिक संकट येवून माझेवर अप्रत्यक्षरित्या आर्थिक बहिष्कार लादला आहे. सदरहू अशा अपरिहार्य परिस्थितीत अत्याचार पिडीत व त्यांचे कुटूंबियांच्या उदरनिर्वाहाचे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. म्हणून मला सदर ठिकाणी बसून काम करणेसाठी व घरी येत व ये- जा करणाऱ्या रस्त्यावर माझे जिवितास आरोपीकडून धोका निर्माण झाला असल्याने पिडीत फिर्यादी व त्यांचे कुटूंबियांना तत्काळ पोलीस संरक्षण मिळण्याची गरज आहे. व यातील आरोपीस तत्काळ अटक केले जाणे गरजेचे आहे.म्हणून मला सदरचे अर्ज करणे भाग पडत आहे. तरी, आरोपी श्री. रमेश खामकर यांस तत्काळ अटक करण्याचे आदेश देण्यात यावेत  अन्यथा आमच्या चर्मकार विकास संघटनेच्या वतीने सदरील अन्यायग्रस्त दलित कुटूंबियांना न्याय मिळवुन देणेकामी आपल्या कार्यालयासमोर दि. 25 ऑगस्ट 2022 पासून श्री. चऱ्हाटे, त्यांची पत्नी व दोन लहान मुलींसह बेमूदत अन्नत्याग (उपोषण) आंदोलन करण्यात येईल व सदर आंदोलनास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास, पोलीस प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहिल याची कृपया नोंद घेण्यात यावी असेही त्यांनी नमूद केले आहे.